
कराड : आपला जीव धोक्यात घालून कृष्णा नदी पात्रामध्ये बुडणाऱ्या मुलीचा जीव वाचवणाऱ्या पोलीस कर्मचारी संताजी तानाजी माने, रा.भोसे, ता.कोरेगाव यांचा सह्याद्री कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी सर्व सभासदांच्यावतीने माजी सहकार व पणन मंत्री, कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचेकडे अंगरक्षक म्हणून सेवेत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल संताजी माने यांना कराड येथील कृष्णा पुलावर गर्दी दिसली, त्यामुळे त्यांनी खाली वाकून पाहिले असता आपला जीव वाचवण्याची धडपड करत असलेली युवती त्यांना दिसली, क्षणाचाही विलंब न करता त्यांनी त्या युवतीला पाण्यातून बाहेर काढून तीचे प्राण वाचवले. या साहसी कार्याबद्दल त्यांना सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित पाटील चिखलीकर, जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समिती माजी सभापती मानसिंगराव जगदाळे कारखान्याचे व्हाईस चेअरमन कांतीलाल पाटील, शंकर खापे (बापू), सुहास बोराटे, प्रणव ताटे, दाजी पवार, निवासराव पाटील, जशराज पाटील (बाबा) यांचेसह सर्व आजी माजी संचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कृष्णा नदी पुलावरून अनेक नागरिक पूजेचे साहित्य, निर्माल्य, नैवेद्य, फुले, अन्न पदार्थ नदीमध्ये टाकतात, तसेच या पुलाच्या दोन्ही बाजूंनी पादचारी मार्गावरून शाळा कॉलेजचे विद्यार्थी व नागरिक पायी ये- जा करतात, त्याचबरोबर या पुलावरून पाण्यात उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रकार ही यापूर्वी अनेकवेळा घडले आहेत. कुणाच्याही जीवितास धोका होऊ नये, त्याचबरोबर नदीपात्रामध्ये प्रदूषण होऊ नये, या सर्व बाबींचा विचार व्हावा, यासाठी माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी या पुलाच्या दोन्ही बाजूच्या रेलिंगच्या भिंतींवर सुमारे तीन मीटर उंचीने लोखंडी जाळी बसविण्याकरता कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर यांचेकडे दिनांक 28/8/2025 आणि 23/10/2025 ने पत्रव्यवहार करून पुलाच्या दोन्ही बाजूच्या रेलिंगवर तीन मीटर उंचीने संरक्षक लोखंडी जाळी तातडीने बसवण्याची मागणी केली आहे.
सदर पुलाच्या रेलिंगवर लोखंडी जाळी बसवून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत नागरिकांमधून मागणी होत आहे, सदर ठिकाणी संरक्षक जाळी तातडीने न बसवल्यास व नागरिकांच्या जीवास काही धोका झाल्यास आंदोलनाचा इशारा येथील संघटनांनी दिला आहे.

