पप्पा पाच महिने झाले घरी आलेले नाहीत त्यांची खूप आठवण येते
मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबीयांनी साधला प्रसारमाध्यमांशी संवाद

जालना : मनोज जरांगे पाटील यांची पत्नी आणि मुलाने बीड येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. पप्पा पाच महिने झाले घरी आलेले नाहीत. त्यांची खूप आठवण येत आहे. त्यांनी घराकडे लवकर येण्यासाठी सरकारने मराठ्यांना लवकर आरक्षण जाहीर करावं असे त्यांची पत्नी आणि मुलगा शिवराज यांनी सरकारला साकडं घातलं आहे.
सरकारने लवकरात लवकर आरक्षण दिले पाहिजे. 23 वर्षांपासून जरांगे पाटील समाजासाठी उपोषण करत आहेत. सरकारने अपेक्षा पूर्ण केली पाहिजे. साडे पाच महिने झाले पाटील घरीच आलेले नाहीत. याचं आम्हाला खूप दुःख वाटत आहे. आरक्षण लवकर मिळाले तर पाटील घरी येतील. मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नी बोलताना भावूक झाल्या होत्या. मराठा आरक्षण मिळेल यासाठी आम्ही आशावादी आहोत. परंतू सरकारने लवकर आरक्षण जाहीर केले पाहिजे. पप्पांची आठवण रोज येतेय असे त्यांचा मुलगा शिवराज याने म्हटले आहे.
आंदोलन असल्यावर आलो तर तुमचा गेलो तर समाजाचा असे सांगून पाटील घराबाहेर पडतात. सरकारला विनंती आहे, यापुढे त्यांच्यावर उपोषण करण्याची वेळ आणू नये अशी विनंती या मायलेकांनी केली आहे. साडे पाच महिन्यानंतर आम्हाला भेटता आले. म्हणून अश्रू अनावर झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मुंबई जाम करायची की नाही हे सरकारच्या हातात आहे. आरक्षण मिळाले तर मुंबई कशाला जाम करतील. गुलाल टाकून परत येतील. त्यामुळे मराठ्यांची लवकरच दिवाळी साजरी होईल अशी अपेक्षा असल्याचे त्यांच्या पत्नीने म्हटले आहे.