पेट्रोल डिझेलपासून लवकरच मुक्ती मिळणार
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलमध्ये होणाऱ्या दरवाढीने सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. मात्र, पेट्रोल डिझेलपासून लवकरच मुक्ती मिळणार असल्याचं वक्तव्य खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.
ते एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी गडकरी म्हणाले की पुढच्या वेळी ते चौपालवर येतील तेव्हा देशातील महामार्ग अमेरिकेच्या तोडीचे असतील. स्काय बसेस रस्त्यावर धावतील, इलेक्ट्रिक हायवे असतील. देशाला पेट्रोल आणि डिझेलपासून मुक्ती मिळेल. एवढेच नाही तर अन्न पुरवणारा शेतकरी विमानाचं इंधन पुरवठादार होईल.
पुढच्या वेळी चौपालवर येईल त्यावेळी अमेरिकेशी स्पर्धा करणारे राष्ट्रीय महामार्ग बांधलेले असतील, असे गडकरी चौपालमध्ये म्हणाले. त्यांना पुढील टर्ममध्ये कोणते काम करायचे आहे, असे विचारले असता ते म्हणाले की, हे काम पंतप्रधान ठरवतात, भाजपचा कार्यकर्ता या नात्याने जे काम माझ्यावर येईल ते पूर्ण जबाबदारीने करेन.
लोकसभा निवडणुकीत 400 जागांचा टप्पा पार करण्याबाबत विचारले असता गडकरी म्हणाले की, तीन राज्यांतील निवडणूक निकाल हे केंद्र सरकारवरील जनतेचा विश्वास वाढल्याचे द्योतक आहेत. केवळ रस्तेबांधणीमुळे देशाची प्रगती होत नाही. यामध्ये वीज, विमानतळ, रेल्वे यासारख्या क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा समावेश आहे. आज देशातील निर्यात वाढली असून आयात कमी होत आहे. हे सरकारचे यश आहे.
रस्ते वाहतूक मंत्रालयाबाबत ते म्हणाले की, जे अधिकारी निर्णय घेत नाहीत, त्यांच्याशी मी नक्कीच बोलतो. कोणत्याही कामात पुढाकार घेणारे अधिकारी मला आवडतात. रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी नियोजन आवश्यक आहे. यापुढे सर्व काम डिजिटल पद्धतीने होणार आहे, म्हणजे काम कुठे पोहोचले आणि कुठे थांबले हे कळेल, असे सचिवांना सांगितले असल्याचे गडकरी म्हणाले.
सध्या तपास यंत्रणांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. यावर बोलताना गडकरी म्हणाले,की एजन्सी त्यांचे काम करत आहेत. कुठे काही संशयास्पद आढळलं तरच तपास केला जात आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, याला राजकीय वाद बनवू नका.