
कराड ः सातारा व सांगली जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार असलेले दोघेजण जखिणवाडी व कोयना वसाहत मलकापूर याठिकाणी छुप्या स्वरूपात वावरत असताना सोमवारी रात्री कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने दोघांना अटक केली.
पृथ्वीराज बाळासो येडगे व देवेंद्र उर्फ देवा येडगे दोघेही (रा. जखिणवाडी, ता. कराड)असे अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार पृथ्वीराज येडगे, देवा येडगे व त्याचे दोन साथीदारांना सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार केले होते. मात्र पृथ्वीराज येडगे व देवा येडगे हे जखिणवाडी व कोयना वसाहत मलकापूर गावच्या हद्दीत छुप्या स्वरूवात वावरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांना मिळाली. याबाबत कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार देवा येडगे हा जखिणवाडी गावच्या चौकात बिरोबा मंदिर शेजारी दहशत माजवताना गुन्हे प्रकटीकरणच्या टीमला मिळून आला, पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता पतंग पाटील व त्यांच्या पथकाने पाठलाग करून त्याला अटक केली. तर पृथ्वीराज येडगे हा कोयना वसाहत मलकापूर येथे छुप्या स्वरूपात वावरत असताना त्यालाही डीबी पथकाने अटक केली.
सदरची कामगिरी डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, पोलीस हवालदार शशि काळे, संतोष पाडळे, कुलदीप कोळी, महेश शिंदे, आनंदा जाधव, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, सोनाली पिसाळ यांनी केली.