
कराड : खा.श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे उत्तरमांड मध्यम प्रकल्प ता.पाटण अंतर्गत कळंत्रेवाडी (ता.कराड) येथील पुनर्वसन गावठाणातील अंतर्गत रस्ते व रस्त्याच्या कडेला गटर बांधणे कामासाठी सुमारे 71 लक्ष निधीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने दिली असल्याची माहिती खा.श्रीनिवास पाटील यांचे कार्यालयाच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
या दोन्ही कामासाठी पुनर्वसित कळंत्रेवाडी मधील ग्रामस्थांनी खा.श्रीनिवास पाटील यांच्याकडे मागणी केली होती. खा.श्रीनिवास पाटील यांनी पुनर्वसनांतर्गत नागरी सुविधांच्या कामासंदर्भात लघु पाटबंधारे विभाग व साताराचे जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. त्यानुसार कळंत्रेवाडी पुनर्वसन गावठाणातील अंतर्गत रस्त्याच्या उर्वरीत कामासाठी 40 लाख 59 हजार व पुनर्वसन गावठाणामध्ये रस्त्याच्या कडेला गटर बांधण्याच्या कामासाठी 30 लाख 51 हजार रूपये एवढ्या निधीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
नाणेगाव बुद्रूकचे (ता.कराड) पुनर्वसन कळंत्रेवाडी येथे झाले आहे. मात्र गावातील मुलभूत सोयीसुविधा तयार नसल्याने त्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सरपंच नम्रता बोडके, विनोद साळुंखे, निवास पाटील, अशोक पाटील, समाधान कदम, सतीश पाटील, रमेश पाटील, पतंगराव पाटील, नामदेव पाटील, राहुल पाटील, संजय पाटील आदी ग्रामस्थांनी खा.श्रीनिवास पाटील यांच्याकडे केली होती. सातारा लोकसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधांसाठी खा.श्रीनिवास पाटील नेहमीच आग्रही राहिले आहेत. त्यानुसार ही कामे होणार असल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.