वसईत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आगरी सेनेने दाखवले काळे झेंडे

मुंबई ः वसई विरार शहराला सुर्या प्रकल्पाचे पाणी दिले जात नसल्याच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आगरी सेनेतर्फे त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. या प्रकरणी विरार पोलिसांनी दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
वसई जनता बँकेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाच्या सांगता समारंभासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शुक्रवारी वसईत आले होते. सध्या वसई विरारचा पाणी प्रश्न पेटला असून दुसरीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्नही पेटला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र सकाळी उड्डाणपूलाजवळ येताच आगरी सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला. यामुळे एकच गोंधळ उडाला. विरार पोलिसांनी या प्रकऱणी दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
सूर्या प्रकल्पाचे काम पुर्ण होऊन तीन महिने झाले आहेत. तरी देखील पाणी देण्यात आलेले नाही. राजकीय श्रेय घेण्यासाठी उद्घटन रखडवून ठेवले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही हे आंदोलन केल्याची माहिती आगरी सेनेचे अध्यक्ष कैलास पाटील यांनी दिली. वसई जनता बँक ही संघाची होती. तरी देखील नितीन गडकरी हे बविआचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत एका मंचावर आले. त्यामुळे कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.