गुरव खूनप्रकरणी सहाजणांना अटक; कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी

कराड, ः प्रेमीयुगुलाला पळून जाण्यास मदत केल्याच्या संशयावरून जनार्दन महादेव गुरव यांना जबर मारहाण केली होती. या मारहाणीत गुरव यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी या अगोदर तीन जणांना अटक केली होती. गुरूवारी रात्री उशिरा या प्रकरणात आणखी तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता दि. 6 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शेखर ऊर्फ उदय भिमराव पवार, बाबासाहेब भिमराव पवार, गौरव बाबासाहेब पवार, विकास पाडळे, विनायक चंदुगडे सर्व (रा. हजारमाची, ता. कराड) व सचिन निंबाळकर (रा. सैदापूर ता. कराड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हजारमाची येथील प्रेमी युगुल पळून गेल्यानंतर यातील युवतीच्या संतप्त झालेल्या नातेवाईकांनी युवकाच्या कुटूंबाला बेदम मारहाण केली. तसेच पळून जाण्यासाठी मदत केल्याच्या संशयातून जनार्दन गुरव यांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन खून करण्यात आला. सुर्ली, ता. कराड येथे घाटात सोमवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात दहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेखर ऊर्फ उदय भिमराव पवार, बाबासाहेब भिमराव पवार, गौरव बाबासाहेब पवार (तिघेही रा. हजारमाची, ता. कराड) या तिघांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. त्यानंतर बुधवारी पोलिसांनी तीन संशयितास ताब्यात घेतले. त्यानंतर विकास पाडळे, विनायक चंदुगडे रा. हजारमाची, ता. कराड व सचिन निंबाळकर रा. सैदापूर चौकशीनंतर अटक केली. आता अजून चार संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत. लवकरच त्यांनाही अटक केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले. अटक केलेल्या संशयितांना न्यायालयात हजर केले असता 6 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदरची कामगिरी डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, पोलीस उपनिरीक्षक पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय देवकुळे, हवालदार सचिन सुर्यवंशी, शशि काळे, संतोष पाडळे, कुलदिप कोळी, धिरज कोरडे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांनी केली.