मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी, धमकी देणारा गजाआड

मुंबई ः रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना पाचवेळा जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. इमेलद्वारे आधी 20 कोटी, मग 200 कोटी आणि नंतर 400 कोटींची मागणी करणारे पाच मेल्स प्राप्त झाले होते. याप्रकरणी मुंबई पोलीस आणि सायबर पोलिसांनी कसून चौकशी केली असून एका 19 वर्षीय तरुणाला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे. गणेश रमेश वनपारधी (वय 19 वर्षे) याला अटक करण्यात आली असून त्याला 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. “काही किशोरवयीन मुलांनी केलेले हे दुष्कृत्य आहे. आमचा तपास सुरू आहे आणि आम्ही या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करू”, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
अंबानींना शुक्रवारी (27 ऑक्टोबर) पहिला धमकीचा मेल आला. मेल पाठवणाऱ्याने त्याचे नाव शादाब खान असल्याचे म्हटले होते. अंबानींना जीवे मारण्याची धमकी देत 20 कोटी रुपयांची मागणी केली. यानंतर अंबानींच्या घराच्या अँटिलियाची सुरक्षा पाहणारे देवेंद्र मुन्शीराम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. अंबानींकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दुसऱ्या दिवशी आरोपींनी त्यांना दुसरा ईमेल पाठवला आणि खंडणीची रक्कम दुप्पट केली. तसंच, तिसऱ्यांदा 400 कोटी रुपयांची मागणी केली. तर, मंगळवार आणि बुधवारी असे आणखी दोन खंडणीचे ईमेलही आले.
“तुमची सुरक्षा कितीही मजबूत असली तरी आमचा एक स्नायपर तुम्हाला मारू शकतो. यावेळी 400 कोटी रुपयांची मागणी आहे. पोलीस माझा माग काढू शकत नाहीत किंवा मला अटक करू शकत नाहीत”, असं मेलमध्ये म्हटलं होतं. या मेलनंतर मुंबई पोलिसांनी सोमवारी अंबानींच्या मुंबईतील घर अँटिलियाची सुरक्षा वाढवली होती.
या मेलप्रकरणी गावदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 387 (एखाद्या व्यक्तीला मृत्यूची भीती किंवा गंभीर दुखापत) आणि 506 (2) (गुन्हेगारी धमकीची शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. सातत्याने धमकीचे मेल प्राप्त होत असल्याने मुंबई पोलीस मेल पाठवणाऱ्याच्या शोधात होते. यासाठी सायबर विभागाची मदत घेण्यात आली. ईमेलच्या आयपी ॲड्रेसची छाननी करण्यात आली. त्यानुसार, आरोपी तेलंगणात असल्याचं समोर आलं. त्यामुळे त्याला तेलंगणातून अटक करण्यात आली.