शामगाव येथे पाण्यासाठी कॅन्डल मार्च, उपोषणाचा चौथा दिवस, तिघांची प्रकृती खालावली

कराड ः शामगाव ता. कराड येथील शेतीच्या पाण्याच्या उपोषणाचा चौथ दिवस असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावात कॅन्डल मार्च काढण्यात आला. तर उपोषणास बसलेल्या तिघांची प्रकृती खालावली असून अशोक सुर्यवंशी या उपोषणकर्त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून इतर उपोषणकर्ते आपल्या आपल्या मागणीवर ठाम आहेत.
गेल्या चार दिवसांपासून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. रात्री महिला व ग्रामस्थ यांनी गावातून कॅन्डल मार्च काढला. यामध्ये पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे या घोषणा देण्यात आल्या तर रात्री पाण्याचे महत्त्व या विषयी गोंधळी कार्यक्रम संपन्न झाला.
उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कराड उत्तरचे भाजपाचे नेते मनोज घोरपडे, सरपंच परिसदेचे राज्य अध्यक्ष जितेंद्र भोसले, अजित भोसले, बनवडीचे माजी सरपंच राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे प्रशात यादव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका महिला आघाडीच्या सुरेखा डुबल, कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामदास पवार, बाजार समितीचे संचालक सतिश इंगवले बाळासाहेब सुर्यवंशी, बाळासाहेब भोसले, मारुती चव्हाण एम. बी. चव्हाण, अक्षय चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, अजित पवार आदिसह इतर ग्रामस्थांचा समावेश होता.