कराड शहरात कोबिंग आॅपरेशनमध्ये दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली

कराड ः शिवाजी स्टेडीयम परिसरातील ईदगाह मैदान रोडकडेच्या झुडपांच्या आडोशाला अंधारामध्ये असलेले पाचजण दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. त्याची माहिती मिळाल्यावर सातारा गुन्हे शाखा आणि कराड शहर पोलिस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने संबंधितांना ताब्यात घेतले. शहरात कोंबिग आॅपरेशन सुरू असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडुन दोन देशी बनावटीचे पिस्टल, पाच जिवंत काडतुस, एक गावठी कट्टा, त्यात वापरणेत येणारे राऊंड, एक लोखंडी टॉमी, मिरची पुड, माकडटोपी, काळ्या रंगाचा कापडी मास्क असा एक लाख ७१ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी परशुराम उर्फ परशा रमेश करवले (वय- 23, रा. सोमवार पेठ, कराड) निशीकांत निवास शिंदे (वय- 21 वर्षे, रा. रेठरेकर कॉलनी, शनिवार पेठ, कराड), तुषार उर्फ बारक्या सुभाष थोरवडे (वय- 23 वर्षे, रा. बुधवार पेठ, कराड), आकाश उदय गाडे (वय- 19 , रा. बुधवार पेठ, कराड) यांना अटक केली असुन एकजण पळुन गेला असल्याचे शहर पोलिसांनी सांगीतले.
पोलिसांची माहिती अशी ः येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयम परिसरातील ईदगाह मैदान रोडकडेच्या झुडपांच्या आडोशाला अंधारामध्ये परशुराम करवले, निशीकांत शिंदे, तुषार उर्फ बारक्या थोरवडे, आकाश गाडे व अन्य एकजण दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. त्याची माहिती पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकुर, पोलिस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांना मिळाली. त्यांनी तातडीने तेथे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक राजु डांगे व सहकाऱ्यांना पाठवले. त्यांनी संबंधित ठिकाणी जावुन संबंधितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे झडती घेतल्यावर त्यांच्याकडे दोन देशी बनावटीचे पिस्टल, पाच जिवंत काडतुस एक गावठी कट्टा, त्यात वापरणेत येणारा राऊंड, एक लोखंडी टॉमी, मिरची पुड, माकडटोपी, काळ्या रंगाचा कापडी मास्क असा एक लाख ७१ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.