
कराड : परदेशी नागरिक आज ज्ञानेश्वरीवर पी. एचडी करत आहेत. जगाने भारतातील ग्रंथांचा अभ्यास करून जीवन त्यानुसार जगत आहेत. अशावेळी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचायला आजच्या तरूणांना आणि पिढीला 61 वर्षीही वेळ मिळत नाही, अशी खंत माजी प्राचार्य ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार पी. एम. पवार (सर) यांनी व्यक्त केली.
तांबवे फाटा- साकुर्डी (ता. कराड) येथील दिवाळी सणानिमित्त ”पुस्तकांचा फराळ” या पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक आणि पत्रकार अभयकुमार देशमुख उपस्थित होते. तसेच साकुर्डीचे उपसरपंच विश्वासराव कणसे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, सर्जेराव थोरात, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबवेचे मुख्याध्यापक अशोक देसाई, राजेंद्र चव्हाण, अमित फल्ले, मंगेश पाटील, किसन थोरात, वसंत पवार, मनीषा अवघडे, मनीषा साठे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
अभयकुमार देशमुख म्हणाले, भगवद्गीता आणि रामायण यांनी कुटुंबातील एकसंधता आजही जिवंत ठेवली आहे. आजच्या पिढीला वैचारिक विचार मिळण्यासाठी पुस्तकांची गरज आहे. ग्रामीण भागात पुस्तक प्रदर्शन ही संकल्पना राबवणे म्हणजे वैचारिक बैठक निर्माण करणे आणि पुढील पिढी विचारशील बनवणे यासाठी टाकलेले पाऊल आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीकांत बाबर यांनी केले. आभार मुख्याध्यापक आबासो साठे यांनी मांडले.
पुस्तक भिशी संकल्पना
प्रदर्शनात छोट्या मुलांसह मोठ्यांसाठी स्वतंत्र दालन ठेवण्यात आले. तसेच नामवंत साहित्यिकांची पुस्तके त्याबरोबर मुलांसाठी आवडत्या गोष्टींची, विज्ञान प्रयोगांची, कोड्यांची पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत. या प्रदर्शनातून वार्षिक सभासद नोंदणी 1000 रुपये केल्यास वर्षभरात आवडीची पुस्तके वाचण्यास मिळणार आहेत. त्यासोबत पुस्तक भिशी उपक्रम राबविण्यात आला आहे. महिना ठराविक रक्कम भरायचे आणि वर्षाच्या शेवटी त्याच्यावर 50 टक्के रक्कम वाढवून त्या किंमतीची पुस्तके खरेदी करता येणार आहेत.