कृषीराज्यसातारा

संघटना रस्त्यावर शेतकरी मात्र फडातच

‌कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगलीप्रमाणे सातारा जिल्ह्यात ऊस दराच्या आंदोलनाला धार आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटनेने दोन दिवसांमध्ये चक्काजाम आणि उस वाहतूक करणारी वाहने अडवली. साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा, यासाठी संघटना एकीकडे रस्त्यावर उतरल्या असताना शेतकरी मात्र फडातच असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, पाण्याअभावी टनेज घटू लागल्याने लवकरात लवकर ऊस घालवण्याकडे शेतकर्‍यांचा कल आहे. त्यामुळे आंदोलनात ऊस उत्पादक दिसत नसल्याचे चित्र आहे. दरासाठी संघटना भांडत असताना शेतकर्‍यांचा अपेक्षित रेटा दिसत नसल्याने कारखानदारांचे मात्र फावत आहे.

कितीतरी दिवसांनी ऊस दरासाठी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. गत हंगामातील 400 रुपये आणि एफआरपी 3,500 या प्रमुख मागणीसाठी आंदोलने केली जात आहेेत.

कोल्हापूर व सांगलीत आंदोलन पेटले असतानाही सातार्‍यातही सातारा, फलटण व खटावमध्ये आंदोलन झाले. मात्र, इतर तालुक्यात आंदोलनाचा जोर दिसत नाही.

एका शेतकरी संघटनेकडून साखर कारखानदाराला एक टन उसापासून किती उत्पन्न मिळते याची जंत्रीच काढली आहे. यामध्ये 10.60 टक्के उतारा गृहीत धरून 106 किलो साखरेचे 3 हजार 710, बगॅसचे 682, मळीचे इथेनॉल 585, अल्कोहोलचे 300 आणि कंपोस्टचे 37 असा 5 हजार 314 रुपयांचे उत्पन्न मिळते.

ऊस दराच्या आंदोलनात कोल्हापूर व सांगलीत जी आंदोलने सुरू आहेत त्याला शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या ठिकाणी संघटनांच्या पदाधिकार्‍यांकडून एक मॅसेज पोहोचला की शेतकरी कांदा न् भाकरी घेऊन आंदोलनात सहभागी होत आहेत. मात्र, सातार्‍यात उलटी परिस्थिती आहे. सातार्‍यात शेतकरी संघटनांना तुमचे तुम्ही बघा, असे म्हणतच आंदोलनात सहभागी होत नसल्याचे वास्तव आहे.

कोल्हापुरात स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला केवळ पदाधिकारीच नव्हे तर शेतकरीही साथ देत आहे. इतर संघटनांकडूनही दरासाठी आंदोलन सुरू असताना शेतकरी हिरिरीने सहभाग घेत आहेत.

सातार्‍यात शेतकरी संघटना एकीकडे अन् शेतकरी दुसरीकडे असे चित्र आहे. संघटना व शेतकर्‍यांमध्ये समन्वय नसल्याने शेतकर्‍यांची संघटनांना साथ मिळत नाही.

सातार्‍यात ज्या शेतकर्‍यांसाठी संघटना भांडत आहेत त्यांना शेतकर्‍यांची साथ मिळणार कधी? हे न उलगडणारे कोडेच आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close