सातारा लोकसभा मतदार संघात देखील आम्हाला तुतारी आणि पिपाणीमुळे फटका बसला : शरद पवार

मुंबई : “राज्य सरकारने योजना जाहीर केल्या, पण माझा अनुभव आहे की, अंदाजपत्रक मांडल्यानंतर 6 महिन्यांनी पुरवणी मागण्या मांडल्या जातात. पण इथं केवळ 8 दिवसात पुरवणी मागण्या मांडल्या. शासनाकडे असलेला निधी आणि घोषित केलेल्या योजना यात खूप अंतर दिसतं” असं निरीक्षण शरद पवार यांनी नोंदवलं.
“मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय चांगला आहे. पण संपूर्ण राज्यात ही योजना पार पाडता येईल का?” असा सवाल शरद पवार यांनी विचारला.
“आम्हाला लोकसभेला तुतारी आणि पिपाणी यामुळे फटका बसला. सातारा लोकसभा मतदार संघात देखील आम्हाला फटका बसला आहे. आमचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे आहे. आम्ही स्थापन केलेला पक्ष आणि चिन्ह वेगळी भूमिका घेतलेल्या लोकांना दिला. हे सगळं प्रकरण कोर्टात आहे, पुढील आठवड्यात त्याची सुनावणी आहे” असं शरद पवार म्हणाले.
“स्वखुशीने देणगी स्वीकारण्याचा दिलेला निर्णय आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे” असं शरद पवार म्हणाले. “पक्ष सोडून गेलेले लोक परत येण्याबाबत मला कोण भेटलं नाही, पण जयंत पाटील यांना भेटले याची मला माहिती आहे” अस पवार म्हणाले. “नरेंद्र मोदी यांचा देश चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न जनतेनं हाणून पाडला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत देखील अशाच पद्धतीने जनता निर्णय घेईल” असं शरद पवार म्हणाले.