
कराड ः मलकापूर ते ढेबेवाडी जाणाऱ्या रोडवर चाकूचा धाक दखवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पळून निघालेल्या संशयित आरोपीस कराड शहर गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून 30 हजार रूपये किमतीची अर्धा तोळ्याची सोन्याची चैन व धारदार शस्त्र पोलिसांनी जप्त केले आहे.
सुरेश सिध्दाप्पा दौडमणी (वय 30, रा. कोयना वसाहत, मलकापूर, ता. कराड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहर व परिसरातील होणाऱ्या चैन स्नॅचिंग रोखण्याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांना सूचना दिल्या होत्या. त्याबाबत गुन्हे शाखेचे एक पथक तयार करण्यात आले होते. गुरूवारी गुन्हे शाखेचे पथक चैन स्नॅचिंगचे अनुषंगाने शहरात प्रतिबंधक गस्त करीत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की मलकापूर ते ढेबेवाडी जाणाऱ्या रोडवर एकाने चाकूचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेऊन पळाल्याचे सांगितले. याबाबत कोंडीराम पाटील यांनी पतंग पाटील यांना तात्काळ घटनास्थळी रवाना होण्याचे आदेश दिले. पतंग पाटील व पोलीस हवालदार शशि काळे, अमित पवार, कुलदिप कोळी, संतोष पाडळे. अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे यांनी सुरेश दौडमणी याचा पाठलाग करून त्याला नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून 30 हजार रूपये किमतीची अर्धा तोळ्याची सोन्याची चैन व धारदार शस्त्र जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांचे मार्गर्दशनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, पवार, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, पोलीस हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, कुलदीप कोळी, संतोष पाडळे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, महेश शिंदे, सोनाली पिसाळ, वाहतुक शाखेचे संतोष पाटणकर यांनी केली.
Tags
crime news Karad Satara