गांजा, चिलीम ओढून लिहीणारे बिथरले आहेत
भाजप आमदार आशिष शेलार यांची उबाठा गटाचे नेते संजय राऊतांवर टीका

मुंबई : तुम्ही तुमच्या विझणाऱ्या दिव्या खालचा अंधार बघा. देव, देश आणि धर्माची चिंता जनता करेल, असा पलटवार भाजप आमदार आशिष शेलार यांनी उबाठा गटाचे नेते संजय राऊतांवर केला आहे. त्यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवर पोस्ट करत राऊतांवर टीका केली आहे.
आशिष शेलार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, “देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुन्हा दणदणीत विजय होणार हे जनतेने ठरवले आहे. त्यामुळे आपलं ‘कुटुंब’ सावरण्यासाठी धडपडणारे बरळत आहेत. गांजा, चिलीम ओढून लिहीणारे, भोंदूगिरी करून बडबड करणारे आता भयंकर बिथरले आहेत,” असे ते म्हणाले आहेत.
“मंबाजी- तुंबाजी तर मातोश्रीत शिरलेत. पत्रकार पोपटलाल यापैकी एकाची किंवा प्रसंगी दोघांची भूमिका पण चोख बजावत आहेत. तुम्ही तुमच्या विझणाऱ्या दिव्या खालचा अंधार बघा. देव, देश आणि धर्माची चिंता जनता करेल. अजूनही सांगतोय. भोंदूगिरी सोडा आणि जय श्रीराम म्हणा. तरच वाचाल, नाही तर शिल्लक राहिले तेवढे पण संपून जाल,” असा सल्लाही आशिष शेलारांनी राऊतांना दिला आहे.