गायकवाड यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक : नामदार शंभूराज देसाई

उल्हासनगर : शुक्रवारी उल्हासनगर येथील हिललाइन पोलीस ठाण्यामध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. हा गोळीबार भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख या गोळीबारात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्नालयात उपचार सुरु सुरु असून प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे.
महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेण्यासाठी आज ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई रुग्णालयात पोहोचले होते. येथील डॉक्टरांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत माध्यमांना माहिती दिली. गायकवाड यांच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली तरी त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याचं देसाई यांनी सांगितलं.
‘मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केवळ महेश गायकवाड यांना पाहिले. डाॅक्टरांकडून योग्य ते उपचार केले जात आहे. तसेच याप्रकरणात पोलीस त्यांचे काम करतील. पोलीस किंवा कायद्याच्या कामात सरकार अथवा त्यातील कोणताही मंत्री कसलाही हस्तक्षेप करत नाहीत.’ असे देसाई यांनी सांगितले.
तत्पूर्वी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे देखील गायकवाड यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.