५००० हून अधिक एसटी विशेष बसेस आषाढी यात्रेसाठी सज्ज…….! : परिवहन मंत्र्यांची घोषणा

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी राज्य सरकारकडून भव्य नियोजन करण्यात आले असून यंदा राज्य परिवहन महामंडळातर्फे ५२०० विशेष एसटी बसेस सोडण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी बुधवारी येथे अधिकाऱ्यांच्या बैठकीत केली.
यात्रेच्या काळात राज्याच्या कोणत्याही गावातून ४० अथवा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास, त्यांच्या गावातून थेट पंढरपूरसाठी एसटी उपलब्ध करून देण्यात येणार असून यासाठी संबंधित आगाराशी संपर्क साधावा,असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले.या बससेवेवर सरकारच्या “महिला सन्मान योजना” अंतर्गत महिलांना ५०% सवलत आणि “अमृत ज्येष्ठ नागरिक योजना” अंतर्गत ७५ वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास सुविधा मिळणार असल्याचेही सरनाईक यांनी जाहीर केले.
यादरम्यान प्रवासीसेवे सोबतच बस चालक व वाहक यांच्यासाठीही प्रवासात योग्य सोयी-सुविधा देण्याच्याही सूचना देण्यात आल्या असून त्यांच्या राहण्याची व्यवस्था, गरम पाण्याची सोय, तसेच बसस्थानकांवर गाड्यांची देखभाल-दुरुस्ती आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची नेमणूक यांचा समावेश असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
याचदरम्यान विनातिकीट अनेक प्रवासी यात्रा करताना आढळून आले असून अशा विनातिकीट प्रवाशांच्या प्रवास करण्याच्या घटनांवर आळा घालण्यासाठी १२ ठिकाणी तपासणी नाके, तसेच २०० एसटी सुरक्षा अधिकारी आणि कर्मचारी २४ तास पंढरपूर परिसरात तैनात राहणार आहेत,अशी माहिती देत यात्रेच्या दिवशी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३६ हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदतीने तैनात करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी गर्दीचे व्यवस्थापन सुकर करण्यासाठी यंदा पंढरपूरमध्ये चार तात्पुरती बसस्थानके यात अनुक्रमे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज), विठ्ठल कारखाना, येथे उभारली जाणार आहेत. प्रत्येक बसस्थानकावर पिण्याचे पाणी, शौचालय,चौकशी कक्ष,आरक्षण केंद्र, फलक आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
जिल्हानिहाय प्रवासाचे नियोजन
चंद्रभागा बसस्थानक…..
१) मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा
२) भिमा देगाव स्थानक – औरंगाबाद (छ.सं.नगर), नागपूर, अमरावती
३) विठ्ठल कारखाना – नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर
४) पांडुरंग स्थानक – सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग…. असे असणार असून मागील वर्षी एसटीने ५ हजार विशेष बसेसद्वारे २१ लाख भाविकांचा सुरक्षित प्रवास केला होता. यंदा ही संख्या आणि सुविधा अधिक व्यापक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचेही सरनाईक यांनी यावेळी आवर्जून सांगितले.“भाविकांनी या सुरक्षित व सवलतीच्या एसटी सेवेचा लाभ घ्यावा,” असे आवाहन परिवहन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले. त्यामुळेच राज्य शासनाचे हे व्यापक नियोजन यात्रेतील बिनधास्त दर्शन व सुरक्षित प्रवास सुनिश्चित करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.