
पाटण : पाटण येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या तहसिल तसेच विविध शासकीय कार्यालयांचा समावेश असलेल्या बहुउद्देशीय प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तालुक्याच्या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या या अद्यावत प्रशासकीय इमारतीस “छत्रपती शिवाजी महाराज” यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्यजितसिंह पाटणकर यांनी मुंबई येथे निवेदनाद्वारे केली आहे. शिवजयंती उत्सव समिती, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सुंदर स्वराज्य प्रतिष्ठान सुंदरगड संवर्धन समिती, हिंदू एकता आंदोलन अशा विविध संस्था- संघटनांनी या मागणीचे निवेदन सत्यजितसिंह पाटणकर यांच्याकडे दिले होते.
समृध्द असा ऐतिहासिक वारसा लाभलेली पाटणची ही भूमी साक्षात छत्रपती शिवप्रभूच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. सुंदरगड तथा दातेगड, गुणवतगड, जंगली जयगड, भैरवगड हे त्याचे साक्षीदार असून ऐतिहासिक चाफळ क्षेत्री शिंगणवाडी येथे समर्थ रामदास स्वामी व शिवछत्रपती यांची ऐतिहासिक भेट झाली आहे. दृढ निर्धार, समर्पण, त्याग निष्ठा आणि पराक्रमाच्या बळावर छत्रपती शिवाजीमहाराज यांनी रयतेच्या न्याय, हक्काचे स्वराज्य निर्माण करून अठरापगड जाती धर्मातील लोकांना सुरक्षित केले. रयतेच्या हिताचा कारभार करतांना त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा सर्वसामान्य जनतेच्या हिताला न्याय देणारा होता.
आज तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या कामकाजाच्या निमित्ताने पाटण मध्ये नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरु असून येणा-या काळात या इमारती मधून पाटण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय तसेच त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या जाणार आहेत, अशावेळी या बहुउद्देशीय प्रशासकीय इमारतीस रयतेचे राजे “छत्रपती शिवाजीमहाराज” यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आम्ही आपणाकडे या निवेदनाव्दारे नम्रपणे करीत आहोत, या नवीन प्रशासकीय इमारतीस “छत्रपती शिवाजी महाराज” यांचे नांव दिले गेल्यास येथे काम करणा-या प्रत्येक अधिका-यास व कामानिमित्त येणा-या जनतेला त्यापासून प्रेरणा मिळेल.