राज्यसातारा

अंकिता पाटीलचे यश विद्यार्थ्यांना प्रेरणादायी : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

यूपीएससी परीक्षेतील यशाबद्दल कराडकरांच्यावतीने सत्कार

कराड : केंद्रीय लोकसेवा आयोग तथा यूपीएससीची परीक्षा ही देशातील अत्यंत अवघड परीक्षा आहे. देशातील गुणवंत विद्यार्थी भारतीय प्रशासकीय सेवेत निवडले जावेत, हा यूपीएससीच्या परीक्षा मागे उद्देश आहे‌. या परीक्षेत अंकिता पाटील यांनी मिळवलेले यश हे विद्यार्थी, विद्यार्थिनींना प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

यूपीएससी परीक्षेत 303 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल अंकिता पाटीलचा कराडकरांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पुणे सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक प्रकाश पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी चैतन्य कणसे, माजी परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील, माजी नगराध्यक्ष अर्चना पाटील, अशोकराव पाटील, शिवराज मोरे, अरुण पाटील, मनोहर शिंदे, प्रा. सतीश घाटगे, हिंदुराव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. चव्हाण म्हणाले, उच्च दर्जाच्या शिक्षण सुविधा मिळाल्या तरच विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची संधी मिळते. अंकिता पाटील यांच्या यशात त्यांचे आई-वडील, नातेवाईक व मार्गदर्शक यांचा वाटा आहे याबरोबरच अंकिता यांनी प्रचंड प्रमाणात प्रयत्न केल्याने त्यांना यश मिळाले आहे. एनडीएमध्ये तीन वर्षांपूर्वी मुलींना प्रवेश दिला गेला. एनडीएची मुलींची पहिली तुकडी यावर्षी उत्तीर्ण होऊन बाहेर पडली. महिलांना शिक्षण व समाजात काम करण्याची संधी मिळाली तर देशाची प्रगती कोणीच रोखू शकणार नाही. या दृष्टीने अंकिता पाटील यांनी कराड परिसरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला तर नक्कीच त्यांच्यापासून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल.

देशात शिक्षणाचा दर्जा खालावत चालल्याची खंत व्यक्त करताना ते म्हणाले, देशात एकूण 23 आयआयटी आहेत. लाखो विद्यार्थी आयआयटीच्या परीक्षा देत असतात. हा आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँड ही बनला आहे मात्र आयआयटीच्या प्राध्यापकांच्या 41% जागा रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावत चालला आहे

माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनीही अंकिता पाटील यांनी यूपीएससी परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल कौतुक करत त्यांचे यश समाजापुढे आदर्शवत असल्याचे सांगितले.

सत्काराला उत्तर देताना अंकिता पाटील यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कराड परिसरातील विविध आठवणी सांगितल्या. पालकांनी आपल्या मुलींना प्रोत्साहन दिले पाहिजे. देशाच्या विकासात मुली योगदान देऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या आकांक्षांना पालकांनी पंख दिले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. आपल्यामुळे समाजातील लोकांच्या आयुष्यात मदत व्हावी, हा परीक्षा देताना माझा हेतू होता. विद्यार्थ्यांनी संयम व चिकाटी ठेवत मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी क्रेडाई कराड, कराड आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स असोसिएशन, कृष्णा कोयना पतसंस्था, प्रियदर्शनी उद्योग समूह, आनंदराव चव्हाण पतसंस्था, छत्रपती गणेश मंडळ, उदय गणेश मंडळ व शिवाजी क्रीडा मंडळ, भारतमाता गणेश मंडळ यांच्यावतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास स्पर्धा परीक्षेच्या विविध अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी केली.

अंकिता पाटील यांचे वडील अनिल पाटील हे टिळक हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या टिळक हायस्कूलच्या वर्गमित्रांनी अंकिता यांना मानपत्र प्रदान केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close