कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले ट्विट

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेसपदाचा राजीनामा दिला आहे.यामुळे आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये देखील राजकीय भूकंप होणार का ? अशी शक्यता निर्माण झाली आहे. अशात आता राजकीय वर्तुळातून देखील याबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे असं ट्विट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
आपली ट्विटमध्ये नाना पटोले म्हणतात,”काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे.”
पटोले पुढे म्हणतात,”कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू.”