एक हजार टक्के उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र येणार
शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांचा दावा

सोलापूर : एक हजार टक्के उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र येणार हे आज तुम्हाला सांगतो. आपला अंदाज चुकणार नाही. दिवस कुठला ते बघावे लागेल, असा दावा शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.
दरम्यान शहाजी बापू पाटील पुढे बोलताना म्हणाले की, हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवता येणार नाही, हे व्हावेच लागेल कारण हिंदुत्वाचा विचार त्यामागे आहे. पंतप्रधान मोदींकडे उद्धव ठाकरेंना जावे लागण्याचा दिवस येणार आहे. लवकरच येणार आहे, राम मंदिर बांधल्यापासून एक वेगळे वातावरण आहे. अशा वातावरणात जर उद्धव ठाकरेंनाही वाटले की आपणही भाजपसह जावे तर त्यात गैर काही नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले की, महायुतीला लोकसभा निवडणुकीत 45 जागा मिळतील असाही दावा शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीला काही दिवसच राहिले आहेत. इंडिया आघाडी देशात आणि महाविकास आघाडी राज्यात अशी विरोधकांची आघाडी आहे. त्या आघाडीत उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे पक्ष आणि काँग्रेस आहे. उद्धव ठाकरेंच्या प्रचारसभाही जोरात सुरु आहेत. त्यातच मविआमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम झालेली नसताना शहाजी बापू पाटील यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आले आहे.
2019 मध्ये जेव्हा भाजपसह त्यांनी निवडणूक लढवली होती, त्या निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्यावरुन दोन्ही पक्षात टोकाचा संघर्ष झाला. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या समीकरणाची महाविकास आघाडी अस्तित्वात आली.यातच आज शहाजी पाटील म्हणाले की,उद्धव ठाकरे भाजपसह जातील आणि लवकरच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील.