
कराड ः भांडवलदारांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी १९३७ साली कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना झाली. जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या विचारातून सहकाराला बळकटी मिळाली. लोकनेते विलासकाकांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने संघाची चौफेर प्रगती झाली. त्यांनी लावलेली शिस्त आजही काटेकोरपणे पाळली जाते. संस्थेच्या शाखांतुन शेती अवजारे, शेतीची औषधे, बी- बियाणे रासायनिक खते व संघाच्या डिझेल- पेट्रोल पंपावरून तेल खरेदी करून संस्थेच्या प्रगतीसाठी सभासदांनी हातभार लावावा असे आवाहन ऍड. उदयसिंह पाटील -उंडाळकर यांनी केले.
कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सभा आज संघाचे अध्यक्ष अनिलराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, कोयना दूध संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव, कोयन बॅंकेचे अध्यक्ष के टी. पाटील, शामराव पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष शहाजी शेवाळे,प्रा. धनाजी काटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, जेष्ठ संचालक हणमंतराव चव्हाण, रंगराव थोरात, श्रीमंत काटकर, आत्माराम जाधव, उत्तम जगताप, बाजीराव पाटील, कैलास साळवे, यशवंत डुबल, मच्छिंद्र बानुगडे, महेश पाटणकर, दिलीप भिसे, किसन चव्हाण उपस्थित होते.
ऍड. उंडाळकर म्हणाले, संघाला विलासकाकांनी लावून दिलेली शिस्तीमुळे संघाची चौफेर प्रगती झाली आहे. सध्या शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान देणे आवश्यक असून त्यादृष्टीने संघाचा प्रयत्न चालू आहे. यापुढेही ते काम कायम राहिल.
प्रा. धनाजी काटकर यांनी मनोगत व्यक्त केले. सरव्यवस्थापक शशिकांत पाटील यांनी नोटीस वाचन केले. संघाचे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. संचालक प्रताप कणसे यांनी श्रध्दांजलीचा ठराव मांडला. जगनाथ मोरे यांनी आभार मानले.
संघातर्फे १५ टक्के लांभाश ः अध्यक्ष मोहिते
कराड तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अनिलराव मोहिते यांनी २०२४-२५ सालातील संघाच्या उलाढालीचा लेखाजोखा मांडला. यावेळी त्यांनी संघाची ६८ कोटी उलाढाल झाली असुन व्यापारी नफा एक कोटी ८७ लाख रुपये झालेला आहे. सर्व तरतुदी वजा जाता निवळ नफा १२ लाख झाला आहे. यावर्षी सभासदांना १५ टक्के लाभांश दिला जाणार असल्याचे जाहीर केले.

