
कराड ः विमानतळ-मुंढे येथे किरकोळ वादातून पंधरा वर्षीय मुलाला दगडाने मारहाण करुन त्याचा खून करण्यात आला. तर आरोपींनी केलेल्या हल्ल्यात मुलाचा भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी अवघ्या एका तासात दोघांना ताब्यात घेवून अटक केले आहे.
अल्तमस अहमद खान (वय 15, सध्या रा. वारुंजी, ता. कराड, मुळ रा. उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. जखमी निजामुद्दीन अहमद खान याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर याप्रकरणी सचिन रामा भिसे (वय 20, वारुंजी, ता. कराड) व बाळू लक्ष्मण चव्हाण (वय 31, रा. मुंढे, ता. कराड) या दोघांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.
घटनास्थळावरुन मिळालेल्या तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश राज्यातील निजामुद्दीन खान हा कराडातील एका भंगारच्या दुकानात कामाला असून तो वारुंजी गावात भाडेतत्वावर खोली घेवून राहतो. त्याच्याजवळच त्याचा लहान भाऊ अल्तमस हा राहण्यास होता. सोमवारी दोघेही त्यांच्या गावी जाणार होते. रविवारी दुपारी दोघेही खोलीवर असताना बाहेरून फेरफटका मारुन येण्याचा विचार करुन दोघेही खोलीबाहेर पडले. विमानतळ येथे मुंढे गावच्या स्वागत कमानीजवळील एका किराणा दुकानासमोर पोहोचले. त्यावेळी सचिन भिसे व बाळू चव्हाण हे दोघेजण त्याठिकाणी आले. त्यांचा किरकोळ कारणावरुन अल्तमस याच्याशी वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, आरोपींनी रस्त्यावर पडलेले दगड उचलून अल्तमेशला मारहाण केली. त्यावेळी भाऊ निजामुद्दीन हा अल्तमेशला वाचविण्यासाठी आला असताना आरोपींनी त्यालाही दगडाने मारहाण केली. या मारहाणीत डोक्याला अंतर्गत गंभीर इजा झाल्यामुळे अल्तमेशचा जागीच मृत्यू तर निजामुद्दीन गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेत जखमी निजामुद्दीनला उपचारार्थ रुग्णालयात हलवले. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी अमोल ठाकूर, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कोंडीराम पाटील, सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे अरूण देवकर, कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्यासह कर्मचारी तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. तसेच गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींना एका तासाच्या आत ताब्यात घेतले.