प्रकाश आंबेडकर यांनी अचानक आंतरवाली सराटी येथे घेतली मनोज जरांगे यांची भेट

जालना : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आले असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी रात्री अचानक आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे.
प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीची साथ सोडणार असल्याच्या बातम्या येत असतानाच, त्यांनी थेट मनोज जरांगे यांची भेट घेतल्याने राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. त्यामुळे प्रकाश आंबेडकर तिसरी आघाडी तयार करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर हे आपली भूमिका आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार आहे. मात्र, त्यापूर्वी त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची रात्री उशिरापर्यंत बैठक घेतली. या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर थेट आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी तासभर मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. या दोन्ही नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत वेळ आल्यावर नक्की सांगणार असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहे.
या भेटीवर प्रतिक्रिया देतांना मनोज जरांगे म्हणाले की, ‘माझा राजकारणावर विश्वास नाही. समाजाने नाही म्हटले तर नाही. पण समाज हो म्हटला तर इतक्या ताकदीने उतरणार की, त्यांनी मला आंदोलनात जितके हलक्यात घेतले होते तसे राजकारणात घेऊ नयेत असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. तसेच, वंचितकडून प्रस्ताव आला असला तरी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार समाजाच्या हाती दिले आहेत. गावागावातील बैठकीचे निर्णय कळतील. त्यामुळे समाजाच्या म्हणण्यानुसार 30 तारखेला चित्रच स्पष्ट करू. गावा-गावातून अपक्ष उमेदवार देण्याबाबत निर्णय घेवू, माझा जन चळवळीवर विश्वास आहे,” असे मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.