
कराड ः तांबवे (ता. कराड) येथील श्री संत कृष्णतबुवा महाराज, बापुनाना महाराज, मथुरदास महाराज, कृष्णाबाई दिंडी सोहळ्याचे तांबवेतुन पंढरपुरकडे उत्साहपुर्ण वातावरणात आज प्रस्थान झाले. दिंडी चालक महादेव मोरे महाराज यांच्या उपस्थितीत येथील गांधी चौकातील विठ्ठल रुक्णिमी मंदीरात विधीवत पुजन झाल्यानंतर पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला.
तांबवेतील दिंडी सोहळ्याचे यंदाचे २४ वे वर्ष आहे. दिंडी सोहळ्यातील पालखीचे काल डेळेवाडी येथे पुजन करण्यात आले. त्यानंतर दिंडी सोहळा काल रात्री तांबवे येथे आला. आज पहाटे सहाच्या सुमारास श्री. बापुनाना मठातुन पालखी गांधी चौकातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आणण्यात आली. तेथे पालखी सोहळ्याचे पुजन झाल्यानंतर पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. गावच्या वेशीपर्यंत दिंडी सोहळा पोहचवण्यासाठी गावातील आबालवृध्दांनी गर्दी केली होती. तेथुन दिंडी तांबवे फाट्यावर आल्यावर तेथे व्यापारी पेठेतील व्यापाऱ्यांकडुन दिंडीचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर डोंगरी माळावरील दत्तकृपा पेट्रोल पंपाच्या मालकांच्यावतीने स्वागत केल्यानंतर सोहळ्याचे पश्चिम सुपने, वसंतगड, आबईचीवाडी, सुपने, विजयनगर, पाडळी, मुंढे-साळवी मळा येथे दिंडी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. दिंडी सोहळा विमानतळावर आल्यावर तेथेही फटाक्याच्या आतषबाजीत सत्कार करण्यात आला. त्यानंतर दिंडीचा पहिला विसावा खुशबु ढाबा येथे झाले. पोलिस दलाच्यावतीने कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजु ताशीलदार यांच्यावतीने पालखीचे पुजन करण्यात आले. तेथुन दिंडी पुढील मुक्कामासाठी सैदापुरकडे रवाना झाली. दिंडीचे करवडी, रायगाव, चितळी, कलेढोण, झरे, दिघंची, चिकमहुद, पळशी, सुपली, वाखरी येथुन पाच जुलैला पंढरपुरमध्ये आगमन होईल.