
कराड : येथील शिवशंकर नागरी पतसंस्थेतील तेरा कोटीच्या अपहारप्रकरणी दोघांना ताब्यात घेवून अटक करण्यात आले. कराड शहर पोलिसांनी ही कारवाई केली. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शरद गौरीहर मुंढेकर व सुनील आनंदा काशिद (रा. हवेलवाडी-सवादे, ता. कराड) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. विशेष लेखा परिक्षक धनंजय गाडे यांनी गत महिन्यात याबाबतची फिर्याद पोलिसात दिली आहे. पोलिसांनी सांगीतले की, शिवशंकर पतसंस्थेत १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२३ अखेरचे वैधानिक लेखा परिक्षण झाले. त्या अहवालानुसार पतसंस्थेत पतसंस्थेत १३ कोटी ९ लाख ९६ हजार रुपयांचा अपहार झाल्याचा ठपका आहे.
याप्रकरणी शरद मुंढेकर, शंकर स्वामी, महादेव बसरगी, दिपक कोरडे, उमेश मुंढेकर, सतिश बेडके, मिलींद लखापती, मनोज दुर्गवडे, वृषाली मुंढेकर, सिंधू जुगे, शंकर घेवारी, सर्जेराव लोकरे, वसंत काळे, श्रीकांत आलेकरी, शिवाजी पिसाळ, महेश शिंदे, प्रेमलता बेंद्रे, महालिंग मुंढेकर, तात्यासासाहेब विभूते, शिवाजी मानकर, चंद्रकांत दुर्गवडे आदी संचालकांसह व्यवस्थापक रविंद्र स्वामी, कर्मचारी नितीन चिंचकर (रा. कालवडे), संग्राम स्वामी, सुभाष बेंद्रे (रा. रविवार पेठ, कराड), ज्ञानेश्वरी बारटक्के (रा. रविवार पेठ, कराड), दत्तात्रय शिंदे (रा. कोडोली) व सुनिल काशिद (हवेलवाडी-सवादे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी शरद मुंढेकर व सुनील काशिद यांना अटक करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड तपास करीत आहेत.