
पाटण : संभाव्य नैसर्गिक व अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्व विभागांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्व तयारी करून आपत्ती काळात जनतेला त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी केल्या.
येथील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित आपत्ती व्यवस्थापन पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार अनंत गुरव, गटविकास अधिकारी गोरख शेलार, कोयना जलसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितेश पोतदार, पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. गाढे म्हणाले, सर्व विभागांनी संभाव्य अडचणींचा विचार करून योग्य ती साधने उपलब्ध करून ठेवावीत. गत दोन वर्षांपूर्वी भूस्खलन व पूरपरिस्थितीत सर्वांनी चांगले काम केले असून तेच सहकार्य यावर्षीही अपेक्षित आहे. प्रत्येक विभागाने एकमेकांशी समन्वय साधून काम करा. मी स्वत: व तहसीलदार चोवीस तास अलर्ट आहे. कोणतीही अडचण आल्यास तात्काळ संपर्क करावा. तालुक्यात 2021 मध्ये भूस्खलन झाले होते. तेव्हा रस्ता खराब असल्याने घटनास्थळी पोहोचण्यासाठी एनडीआरएफ टीमला वेळ लागला. त्यामुळे संबंधित विभागाने रस्त्यांची डागडुजी करून घ्यावी. दोन वर्षांपासून पर्जन्यमान कमी आहे. तरीही सर्वांनी अलर्ट रहा. टोळेवाडीतील रस्ता धोकादायक असून त्याबाबत बांधकाम विभागाने लक्ष द्यावे. कसणीच्या पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी करावे. अतिवृष्टीकाळात पाटण नगरपंचायतीची जबाबदारी मोठी असून नगरपंचायत प्रशासनानेही दक्ष रहावे. शहरातील होर्डिंग्जबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे सक्त आदेश आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात असलेले अनधिकृत होर्डिंग्ज तात्काळ हटवावेत. त्यात अडथळे येत असतील तर पोलीस बंदोबस्त घ्यावा.
पाटण शहरातही सरकारी जागांवर अतिक्रमणे झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण होते. नगरपंचायत प्रशासन ही अतिक्रमणे का काढत नाही? असा सवाल करून सरकारी जागेवरील अतिक्रमणे काढण्याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच कोयना भागातील हेळवाक आरोग्य केंद्रात डॉक्टरची नेमणूक करावी. वाहतुकीतील अडथळे दूर करावेत. तालुक्यातील स्थलांतरित शाळांमध्ये विजेची जोडणी करावी. नियोजन करताना काही अडचणी येत असतील, तर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
तहसीलदार अनंत गुरव म्हणाले, नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पाटण तहसील कार्यालयात चोवीस तास आपत्ती निवारण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. याद्वारे तालुक्यातील घटनांची माहिती मिळणार आहे. खरंतर आपत्ती येण्यापूर्वीच काही उपाययोजना राबवता येतात का? ते पहावे. यासाठी आपत्तीपूर्वी नियोजन करणे गरजेचे आहे. गतवर्षी दरड व पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने चांगली तयारी केली होती. याहीवर्षी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी सर्वांनी दक्ष राहून समन्वयाने काम करावे.
बैठकीत कोयना जलसिंचन विभागामार्फत पूरपरिस्थितीबाबत नियोजनाबाबत आढावा देण्यात आला. तसेच कोयना धरणावरही पूर नियंत्रण कक्ष स्थापन केला असून तो एक जूनपासून कार्यरत होईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता नितेश पोतदार यांनी दिली.
यावेळी आरोग्य विभाग, वीज वितरण कंपनी, शिक्षण विभाग, बांधकाम विभाग, शेती विभाग, पशुधन विभाग, कृषी विभाग पोलीस विभाग आदी विभागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी गोरख शेलार यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीस सर्व विभागांचे अधिकारी, उपस्थित होते.