
कराड : सौ. वेणुताई यशवंतराव चव्हाण यांची ४१ वी पुण्यतिथी शनिवार दि. १ जून २०२४ रोजी आहे. दरवर्षीप्रमाणे या दिवशी सौ. वेणुताई चव्हाण यांच्या स्मृतींना आदरांजली वाहणाऱ्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन सौ. वेणुताई चव्हाण पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने सौ.वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृहात केलेले आहे.
अभिजात संगीताचे रसिक आणि जाणकार असलेल्या मा. यशवंतरावांच्या मुंबई व दिल्लीमधील घरी दिग्गज कलाकारांचा नेहमीच राबता असे. अनेकदा या कलाकारांचे कार्यक्रम घरी होत असत. सौ. वेणुताई स्वतः जातीने लक्ष घालून या कार्यक्रमांचे अतिशय देखणे आयोजन करत. सौ. वेणूताईंच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना सांगीतिक श्रद्धांजली अर्पण करण्याची प्रथा मा. यशवंतरावजींनी सुरु केली. हीच परंपरा कायम राखत ट्रस्टने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यावर्षी आघाडीचा युवा गायक श्री. मयूर महाजन व झी सारेगम विनर आणि इंडियन आयडॉल फेम अंजली गायकवाड हे दोघेजण मिळून हा कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यांना तबल्यावर श्री. अविनाश पाटील, हार्मोनियमवर श्री. अंगद गायकवाड, पखवाजवर श्री. मनोज भांडवलकर, कीबोर्डवर श्री. आशिष कदम, आणि तालवाद्य श्री. शिवाजी डाके अशी सुरेल साथसंगत लाभणार आहे. अभंग, भक्तिगीते व नाट्यगीतांचा हा कार्यक्रम कराडमधील रसिकांना कायमचा लक्षात राहील असा होणार आहे. शनिवार दि. १ जून रोजी सायंकाळी ठीक ६.०० वाजता सौ. वेणुताई चव्हाण सांस्कृतिक सभागृह येथे होणाऱ्या या विशेष कार्यक्रमास सर्व यशवंतप्रेमींनी आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित रहावे असे आवाहन कराड उत्तरचे आमदार, माजी मंत्री आणि ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त मा. बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.