
कराड ः सहकारी उपसा जलसिंचन संस्थांना वीज व पाणीपट्टी दरवाढीचे मोठे संकट असून ते टाळण्यासाठी संस्थेने बचतीचे धोरण अवलंबावे असे प्रतिपादन सातारा जिल्हा सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या संघ मर्यादित साताराचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केले.
ते सिद्धराज सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित कवठेएकंद ता. तासगाव या संस्थेस दिलेल्या सदिच्छा भेटी प्रसंगी बोलत होते.
प्रकाश पाटील पुढे म्हणाले की, आज सहकारी पाणीपुरवठा संस्थांना राज्य शासनाकडून माफक व सवलतीच्या दरामध्ये वीज आणि पाणीपट्टी आकारणी होणे गरजेचे असून, त्या ऐवजी दहा पटीने दरवाढ करून पाणीपट्टी आकारण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने जाहीर केला आहे, या विरोधात आपण महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्यावतीने शासनाकडे पत्रव्यवहार केला, परंतु त्याला यश आले नाही, म्हणून कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यातील सर्व खाजगी व सहकारी पाणीपुरवठा योजनांनी कोल्हापूर येथे 29 मे 2024 रोजी पंचगंगा नदीलगत हायवेवर रस्ता रोको आंदोलन केले.
त्यावेळी जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर यांचे 6 जून 2024 च्या मुंबई मंत्रालयातील बैठकीचे पत्र मिळाले. मा जलसंपदा सचिवांनी महाराष्ट्रातील इरिगेशन फेडरेशन प्रतिनिधी यांच्याबरोबर सदर दरवाढीबाबतीत सविस्तर चर्चा करून, दहा पट दराने झालेली दरवाढ अन्यायी असल्याचे मान्य केले आणि दिनांक 6 जून रोजी या दरवाढीला तूर्त स्थगितीचे पत्र राज्य इरिगेशन फेडरेशनला देऊन सर्व मुख्य अभियंता सिंचन विभाग यांना पाठवून दिले.
आपण यापूर्वी प्रा.डॉ. एन. डी. पाटीलसाहेब यांच्या नेतृत्वाखाली एकी दाखवून संघर्ष करत आलो अशाच प्रकारची एकी, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष मा. डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली दाखवल्यामुळे सदर आंदोलनास यश आले. या आंदोलनामध्ये आपली संस्था अग्रक्रमाने पुढे होती, संस्थेचे जेष्ठ संचालक लगारे सर हे एन. डी. पाटीलसाहेबांचे विश्वासू सहकारी होते. आपल्या संस्थेच्या संचालक मंडळाने संस्थापक संचालक डॉ. नरेंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक कारभार केल्यामुळे संस्थेस सातत्याने ऑडिट वर्ग अ मिळाला आहे. तसेच संस्थेचे दैनंदिन कामकाज काटेकोरपणे केल्याने व माफक पाणीपट्टी आकारून पाणी वाटपाचे योग्य नियोजन संचालक मंडळाच्या आदेशानुसार समन्यायी पद्धतीने केल्याने संस्थेची इमारत होऊन लाखो रुपयांच्या ठेवी ठेवता आलेले आहेत वरील सर्व बाबींमुळे संस्थेचा सांगली जिल्ह्यामध्ये नावलौकिक वाढलेला आहे संस्थेची भविष्यामध्ये भरभराट व्हावी, व अधिकाधिक नावलौकिक वाढावा यासाठी संचालक मंडळाला व संस्थेच्या सभासदांना प्रकाश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन कोल्हापूरचे संपर्कप्रमुख आर. जी. तांबे, धनाजी पाटील आणि संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन रामचंद्र थोरात, ज्येष्ठ संचालक प्रा. लगारे सर, संचालक व सेवक वर्ग उपस्थित होते.