राज्यशैक्षणिकसातारा

सत्ताधारी शिक्षण संपवत आहेत तर विरोधक बोलत नाहीत ः अशोकराव थोरात

कराड ः सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाचे वार्षिक अधिवेशन लिंब-गोवे सातारा येथे श्री कोटेश्वर शिक्षण संस्थेच्या प्रागंणात संपन्न झाले. यावेळी बोलताना सातारा जिल्हा शिक्षण  संस्था संघाचे अध्यक्ष व राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांनी वरील परखड मत व्यक्त केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सरकार्यवाहक माजी शिक्षक आमदार विजय गव्हाणे, पुणे विभाग महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ अध्यक्ष आप्पासो बालवडकर, महाराष्ट्र राज्य प्रयोगशाळा परिचर महासंघाचे अध्यक्ष भरत जगताप, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन नलवडे, वसंतराव फाळके, अमरसिंह पाटणकर, स्वागताध्यक्ष आनंदराव ऊर्फ नंदाभाऊ जाधव मोहनराव जाधव, डी. के. जाधव, अनिरुद्ध गाढवे, एस. टी. सुकरे यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी बोलताना अशोकराव थोरात म्हणाले, शिक्षणातील समस्यांवर आमदारांना पत्रव्यवहार  केला गेला तरी त्यापैकी कोणीही तुम्ही विषय मांडला आहे त्यावर विचार करतोय त्याबद्दल आपले आभारी आहे, असे साधे कळवायचे धारिष्ट दाखवले नाही. यावरुन त्यांची शिक्षणावरती असणारी तळमळ दिसून येते. मागील सरकारने स्वयंअर्थसहाय्यीत शाळा सुरू केल्या, तसेच 52 हजार शिपाई पदे कमी केली. आता पवित्र पोर्टल आणून सरकारने कुटील डाव शिक्षण क्षेत्रावर टाकला पण दुर्दैवाने विरोधकांच्या अजेंड्यावर किंवा कुठल्या आमदाराचे अजेंड्यावर शिक्षण हा विषयच नाही. तो आपण आणायला सांगितले पाहिजे. गोरगरीब मुलांच्या शिक्षणाचे कसे होणार? तेव्हा कुठल्याही, आंदोलनाला  बहुजनांचा पाठिंबा मिळाला तर तो यशस्वी होणार  ही खूणगाठ आपण मनाशी बांधली पाहिजे.तसेच आपल्या मुलांचे नुकसान होते हे पालकांना कळल्याशिवाय किंवा गावातील लोकांपर्यंत हा विचार गेल्याशिवाय आपल्या आंदोलनाला बळ मिळणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच शिक्षणाच्या होणाऱ्या बाजारीकरणातून बहुजनांना जोडण्याचा नाही तर शिक्षणापासून तोडण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. तेव्हा सरकार ही जात व जमात एकच असून पुढे येऊन शिक्षणक्षेत्र वाचवण्यासाठी बहुजनांनी सरकारला व विरोधकांना धारेवर धरले पाहिजे असे आवाहनपर  मत त्यांनी व्यक्त केले. तेव्हा 6 ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनात सर्व शिक्षण संस्थांनी व समाजातील  शिक्षण प्रेमी पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रमुख पाहुणे  महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सरकार्यवाहक व माजी शिक्षक आमदार  विजय गव्हाणे यांनी अधिवेशनात मांडलेले ठराव नमूद करताना शिक्षण व्यवस्था बरबाद करण्याचे धोरण शासनाने हाती घेतले असून गावातील शाळा बंद करणे, मुख्याध्यापक, कर्मचारी पदे काढून टाकणे, शिक्षकेतर सेवक कपात करणे, शाळा बंद करून आर.टी.ई धोरणांना तिलांजली देऊन गरिबांच्या मुलांना शिक्षण नाकारणे, तसेच महाराष्ट्रातील सर्व शिक्षण संस्था महामंडळाने रस्त्यावर उतरून आंदोलन करून कंत्राटी भरतीचा जी.आर रद्द केला आणि आता पुन्हा नवीन आदेश काढून महाराष्ट्रातील सत्ताधारी सरकार सहा हजार चारशे जागा कंत्राटी पद्धतीने भरू असे म्हणते याचा अर्थ सरकारला आरक्षण पद्धत बंद करून मराठा, ओबीसी, एस.सी, एस.टी तसेच गोरगरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे आहे. कारण कंत्राटी पद्धतीमध्ये कोणालाही आरक्षण मिळणार नाही यातून फक्त शिक्षणाचा व्यवहार होत असुन हा प्रश्न फक्त शिक्षणसंस्था, शिक्षक, कर्मचारी यांचा नसून शिक्षण व्यवस्थेवर होणारा हा हल्ला असून गोरगरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे आणि शिकलेल्या बेरोजगारांना नोकरीपासून वंचित ठेवायचे असा कुटिल डाव शासनाचा आहे तेव्हा समाजातील सर्व घटकांनी, बहुजनांनी शिक्षण व्यवस्था वाचवण्यासाठी पुढे आले पाहिजे असे मत व्यक्त केले.

यावेळी उपस्थितापैकी एस. टी. सुकरे, सचिन नलवडे, भरत जगताप यांचीही भाषणे झाली. सदर भाषणातून कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडत व सरकार राबवत असलेले चुकीचे धोरण याचा जोरदार विरोध केला गेला.
वार्षिक अधिवेशन यशस्वी होण्यासाठी श्री कोटेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव तुकाराम जाधव, संचालक भुजंगराव जाधव, उपाध्यक्ष नामदेवराव जाधव, प्राचार्या विभा साबळे, सर्व संचालक मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेेच शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षिका विद्यार्थी व पालक यांची त्यांना मोलाची साथ लाभली.

अधिवेशनास सातारा जिल्ह्यातील शिक्षण संस्थांचे पदाधिकारी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close