
कराड : पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1962 साली यशवंतराव चव्हाण यांना केंद्रात बोलावून संरक्षणमंत्री केले. नेहरूंच्या पश्चात जगभरात भारताची प्रतिमा कोणी वाली नसल्याची झाली होती. मात्र यशवंतराव चव्हाण यांनी लष्कराचे मनोधैर्य उंचावत मुत्सद्धीपणाने अनेक निर्णय घेतले. त्यामुळे नेहरूंनंतर कोण? हा जगभरातील व भारतातील मुत्सद्धय़ांना पडलेला प्रश्न होता. नेहरूंनंतर भारताचे नेतृत्व कोण सक्षमपणे करेल, यासाठी देशातील नेत्यांची जी नावे घेतली जात होती, त्यात यशवंतराव चव्हाण यांचे नाव प्रथम क्रमांकावर होते, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी दिली.
कराड नगरपालिका नगरवाचनालयाच्या वतीने आयोजित सुवर्ण महोत्सवी यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेत ‘भारताचे संरक्षण, परराष्ट्र धोरण आणि यशवंतराव चव्हाण’ या विषयावर ते बोलत होते.
श्रीराम पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या संरक्षण मंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयांचे अनेक पैलू उलगडून दाखवत 1962 नंतरच्या भारताच्या चार युद्धात भारताचे विजय मिळवला. याची बीजे यशवंतरावांच्या संरक्षण मंत्रीपदाच्या कारकिर्दीत रोवली गेल्याचे सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना यशवंतरावांना नेहरूंनी केंद्रात बोलावून घेतले. मात्र संरक्षण मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारत असताना त्यांच्यासमोर अडचणींची मालिका सुरू झाली. मात्र यावर त्यांनी मुत्सद्दीपणे मात केली. लष्कराच्या आधुनिकीकरणाचे निर्णय घेताना जवानांना भारतीय बनावटीच्या बंदुका देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तो पुढील युद्धांमध्ये देशाच्या फायद्याचा ठरला होता. प्रशासनाचा अभ्यास, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती, अनुभव या गुणांमुळे नेहरूंनी त्यांना संरक्षणमंत्री म्हणून नेमले होते.
पंडित जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर भारताचे नेतृत्व कोण करणार, याबाबत जगभरातील मुत्सद्दी चर्चा करत होते. पंडित नेहरूंचे नेतृत्व त्या काळात जगभरात लोकप्रिय होते. मात्र यशवंतरावांनी संरक्षण मंत्री म्हणून लष्कराचे खचलेले मनोधैर्य उंचावले. भारतात प्रथमपासून पंतप्रधान हे परराष्ट्र खाते स्वत:कडे ठेवतात. ती परंपरा आजही सुरू आहे. या खात्याचे निर्णय पंतप्रधानच घेत असतात, असेही ते म्हणाले.
प्रा. भगवान खोत यांनी परिचय करून दिला. व्यासपीठावर डॉ. माणिक बनकर, माजी नगरसेवक सौरभ पाटील, राजीव अपिने यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालक प्रा. अनिल थोरात यांनी केले. आभार प्रा. पाटील यांनी मानले.