क्राइमराज्यसातारा

विनातारण कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेची सव्वा दोन लाखाची फसवणूक

कराड : विनातारण 40 लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवून महिलेची 2 लाख 28 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी तिघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या उर्फ विजया संपतराव घाडगे (रा. समर्थ संकुल अपार्टमेंट, लाहोटीनगर, मलकापूर) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.

नीलम प्रसाद पाटणकर, प्रसाद श्रीकांत पाटणकर (दोघेही रा. मंगळवार पेठ, कराड) आणि शबाना शेख (रा. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील लाहोटीनगरमध्ये राहणार्‍या विद्या उर्फ विजया घाडगे यांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य गरजेचे होते. त्यादरम्यान जानेवारी 2024 मध्ये त्यांना त्यांच्या मैत्रिणीने नीलम पाटणकर व प्रसाद पाटणकर यांची भेट घालून दिली. नीलम व प्रसाद पाटणकर यांनी कनक फाउंडेशनच्या माध्यमातून कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. सातारा येथील कनक फाउंडेशनची विशेष योजना सुरू असून दरसाल दरशेकडा चार टक्के एवढ्या कमी व्याजदरात विनातारण कर्ज मिळवून देतो, असे पाटणकर यांनी सांगितले.त्यामुळे विद्या उर्फ विजया घाडगे या कर्ज घेण्यास तयार झाल्या.

त्यादरम्यान कनक फाउंडेशन ही संस्था मोठी असून शबाना शेख या त्याच्या अध्यक्षा असल्याचे सांगण्यात आले. विद्या उर्फ विजया घाडगे यांना 40 लाख रुपये कर्जाची आवश्यकता होती. त्यामुळे कर्ज मंजुरीसाठी प्रोसेसिंग फी आणि अनुदान कमिशनसाठी नीलम पाटणकर, प्रसाद पाटणकर व शबाना शेख यांना विद्या उर्फ विजया घाडगे यांनी एकूण 2 लाख 88 हजार 800 रुपये दिले. ही रक्कम तिघांकडे रोख तसेच ऑनलाईनद्वारे देण्यात आली. मात्र, पैसे दिल्यानंतर संबंधित तिघांकडून कर्ज प्रकरणाबाबत कसलीच कार्यवाही झाली नाही. सलग सात ते आठ महिने विद्या उर्फ विजया घाडगे यांनी कर्ज प्रकरण मंजुरीबाबत विचारणा केली. मात्र, त्यांनी कर्ज मंजुरीला वेळ लागणार असल्याचे सांगून टाळाटाळ केली. त्याचदरम्यान 13 नोव्हेंबर 2024 रोजी विद्या उर्फ विजया घाडगे यांनी संशयीतांकडून रक्कम घेतल्याबाबत नोटरी करून घेतली. मात्र, तरीही संबंधितांनी कर्ज प्रकरण मंजूर केले नाही. तसेच घेतलेले पैसेही परत केले नाहीत.

काही दिवसानंतर घेतलेल्या रकमेपैकी शबाना शेख हिने 10 हजार तर प्रसाद पाटणकर याने 50 हजार रुपये विद्या उर्फ विजया घडगे यांना परत केले. उर्वरित रक्कम त्यांनी दिली नाही. त्यामुळे संशयीतांनी आपली 2 लाख 28 हजार 800 रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद विद्या उर्फ विजया घाडगे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार रूपाली कांबळे तपास करीत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close