अखेर बांगलादेश सरकारला आली जाग! मंदिर तोडफोडप्रकरणी चौघांना अटक

नवी दिल्ली : हिंदूंवर सातत्याने होत असलेल्या हिंसाचाराविरोधात अखेर बांगलादेश सरकारने कारवाई सूरु केली आहे. मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने सुनमगंज जिल्ह्यात मंदिर आणि हिंदूच्या घरांची तोडफोड प्रकरणी चौघांना अटक केली आहे.
सुनमगंज जिल्ह्यातील दोराबाजार परिसरात मंदिर आणि हिंदू बांधावांच्या घराची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी बांगलादेशच्या कायदा अंमलबजावणी विभागाने ४ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी 12 जणांव्यतिरिक्त पोलिसांनी 150 ते 170 अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. अलीम हुसेन (19), सुलतान अहमद राजू (20), इम्रान हुसेन (31) आणि शाहजहान हुसेन (20) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
3 डिसेंबर रोजी बांगलादेशातील सुनमगंज जिल्ह्यातील आकाश दास याने एक फेसबुक पोस्ट केली होती. या पोस्टनंतर जिल्ह्यात तणाव निर्माण झाला होता. आकाशने ती पोस्ट डिलीट केली;पण समाजकंटकांनी पोस्टचे स्क्रीनशॉट शेअर करण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरात हिंसाचार उसळला. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, बांगलादेश पोलिसांनी फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट करणार्या आकाश दासला ताब्यात घेतले होते. या पोस्टमुळे समाजकटकांनी त्याचदिवशी त्याला पोलीस कोठडीतून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी हा डाव उधळत आकाश दासची रवानगी दुसर्या पोलीस ठाण्यात केली होती.
5 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला. त्याचे सध्या भारतात वास्तव्य आहे. हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार तेथे सत्ता काबीज केली. यानंतर बांगला देशमध्ये हिंदूंवरील हल्ल्यांमध्ये अचानक वाढ झाली. हिंदू आणि विशेषत: इस्कॉन सदस्यांना लक्ष्य केले जात आहे. काही दिवसांपूर्वी बांगलादेश पोलिसांनी बांगलादेश समिष्ट सनातनी जागरण जोत संघटनेचे प्रवक्ते हिंदू साधू चिन्मय कृष्ण दास यांनाही अटक केली होती. ते अजूनही कारागृहात आहेत.