ताज्या बातम्याराजकियराज्य

ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला.

यंदाच्या निवडणुकीत भाजप 132 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी आता महायुतीत जाण्याची चाचपणी सुरू केल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील एका पदाधिकाऱ्याने भाजप नेत्यांची भेट घेऊन प्रवेशाची तयारी दाखवल्याची माहिती मिळत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाल्यानंतर पुढील पाच वर्षे महायुतीचेच सरकार राहणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील काही पदाधिकाऱ्यांच्या महायुतीशी जुळवून घेण्याच्या हालचाली सुरु असल्याचे बोलले जात आहे.

या पार्श्वभूमीवर नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटातील एका पदाधिकाऱ्याने जलसंपदा मंत्री आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांना मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. मात्र, शुभेच्छा देतानाच या पदाधिकाऱ्याने त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, स्थानिक आमदारांच्या व माजी नगरसेवकांच्या विरोधानंतर कोणाचाही प्रवेश होणार नसल्याचे प्रदेश पातळीवरील नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात महायुतीचा मोठा विजय झाल्याचे दिसून आले. नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघांपैकी तब्बल 14 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही विधानसभा निवडणुकीसारखेच चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील काही पदाधिकारी महायुतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असून आता महाविकास आघाडीतील पदाधिकारी महायुतीत प्रवेश करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यभरामध्ये पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच जोरात सुरू असताना आता जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये चुरस निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. आता जळगावचे पालकमंत्रीपद कुणाला मिळणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close