मुख्यमंत्र्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन आरोपी सुटले, तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही : मनोज जरांगे पाटील

बीड : बीड न्यायालयाने वाल्मीक कराडची सीआयडी कोठडी संपवून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र प्रकृती स्थिर नसल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोटदुखीचा त्रास सुरु झाल्याने त्याला आयसीयूमध्ये भरती केले गेले. सलग ३-४ दिवसांपासून तो आयसीसमध्येच आहे. दरम्यान कोठडीची शिक्षा टाळण्यासाठी कराडने हा बनाव केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘वाल्मीक कराडला काहीही झालेलं नाही. सत्तेचा वापर करुन अधिकारी बाहेर पाठवले जात आहेत. दवाखान्यात नेऊन सोडण्याचं षडयंत्र सुरु आहे. आता सरकारने एक काम करावं. शिवाजीनगर पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर काढा, त्याच्या ड्रायव्हरचे सीडीआर काढा. कराड दुसऱ्यांच्या फोनवरुन बोलते. गेवराई पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याने त्याला चादरी नेऊन दिल्या.’
या प्रकरणावरुन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. ‘मुख्यमंत्र्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन आरोपी सुटले, तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही. सर्वांची नार्को टेस्ट करा आणि केस अंडर ट्रायल चालवा’ असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले, ‘सगळ्या आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना विनंती करतो की, पोलीस अधिकारी, सरकारी डॉक्टरची देखील चौकशी करा. त्याचे डॉक्टर दुखत नसताना दुखत असल्याचे सांगत आहेत. कराडला दुखत नसतानाही त्याला दवाखान्यात का ठेवलं? याची चौकशी करा. वाल्मीकला गुन्ह्यातून सोडवण्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांनी षडयंत्र केले आहे.’