राहुल सोलापूरकर जिथे दिसेल, तिथे ठेचा : खा. उदयनराजे भोसले

मुंबई : अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत.
राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी ही औरंगजेबाची औलाद असून, अशांना गोळ्या घातल्या पाहिजे. राहुल सोलापूरकर जिथे दिसेल, तिथे ठेचा, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांना टोला लागावलाय.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. उदयनराजे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, त्यांनी स्वतः त्याची पूर्तता करावी. ते राजे आहेत, असा टोला त्यांनी लगावला. आम्ही त्यांचे नेहमी मार्गदर्शन घेतो. कोल्हापूरचे महाराज किंवा साताऱ्याचे महाराज असतील, त्यांचा आम्ही संताप समजू शकते. पण ते राजे आहेत, आम्ही प्रजा आहोत, शिवाजी महाराजांची आम्हाला अधिक तळमळ आणि तिडीक आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राजधानी दिल्लीत बुधवारी विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान पार पडले. सत्तारुढ आप पक्ष आणि विरोधी बाकावरचे काँग्रेस आणि भाजपा अशी तिहेरी लढत येथे पाहायला मिळाली. मतदान संपल्यानंतर विविध संस्थांच्या एक्झिट पोल्सचे आकडे समोर आले आहेत. यामध्ये बहुतेक एक्झिट पोल्सचे पारडे भाजपाच्या बाजूने झुकलेले दिसत आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या एक्झिट पोलचे निकाल काही वेगळे होते. हरियाणामध्ये काँग्रेस बहुमताने जिंकेल, असे सांगितले होते, पण भाजप सत्तेवर आली. दिल्लीत निवडणुकीत चुरस होती. दिल्लीची विधानसभा जिंकण्यासाठी भाजपने पैसा आणि सत्तेचा वापर केला, हे रस्त्यावर दिसत होतं. कालची निवडणूक निष्पक्ष झाली नाही. महाराष्ट्राचा पॅटर्न दिल्लीत राबवण्यात आला. आप आणि काँग्रेससोबत लढली असती तर भाजपजवळ देखील आली नसती, पण हे दुर्दैव आहे. आता आम्ही 8 तारखेची वाट पाहत आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
राज्य शासनाच्या तिजोरीत खडखडाट झाल्यानं अनेक योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. एक लाख कोटी रुपयांची तूट भरुन काढण्यासाठी शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा सह इतर योजना बंद करण्याच्या विचारात राज्य सरकार असल्याची माहिती आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, शिवभोजन थाळी आधीच्या महाविकास आघाडी सरकारने गरिबांसाठी सुरू केली होती. या मतांचा या सरकारला फायदा होत नसल्याने तो बंद करण्याचा निर्णय घेतला असेल. भुजबळ यांनी मुद्दा उपस्थित केला, आम्ही त्याचे स्वागत करतो, असे त्यांनी म्हटले.