
सातारा : विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना कडक शब्दात इशारा दिला आहे. मी अजूनही थकलो नाही. माझं वय ७७ आहे. त्यामुळे जुनी दुखणी त्रास देणारच, पण माझं डोकं चालतंय त्याला काय करायचं?
डोकं चालतंय तोपर्यंत तुम्ही काळजी करु नका, खुर्चीत बसून संपवीन असा थेट इशाराच राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना दिला आहे. फलटण येथील कार्यक्रमात रामराजे बोलत होते.
“माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण मी १९९१ ला फलटणमध्ये केलं होतं. तेव्हा पासुनच आम्हाला २५ ते ३० वर्ष चाललेले चुकीचं राजकारण पटत नव्हतं. त्याकाळी विकास आणि सामान्य माणूस नव्हे तर सत्ताच केंद्रबिंदू होती. फलटणच्या राजकारणात गावोगावी भांडणं, मारामाऱ्या सुरू होत्या. हे सगळं थांबवण्यासाठी राजकारणात आलो. भांडणाची संस्कृती थांबवून विकास केला. पाणी आणलं,” असे रामराजे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “मी अजूनही थकलो नाही. मात्र क्रिकेट खेळताना तरुणपणात पायाला लागलेलं होतं. त्यावेळचं पायाचं दुखणं आहे. माझं वय 77 आहे. त्यामुळं ते दुखणं त्रास देणारच. पण माझं डोकं चालतंय त्याला काय करायचं? डोकं चालतंय तो पर्यंत तुम्ही काळजी करु नका. खुर्चीत बसून संपवेन. तुमच्या सगळ्यांच्या विश्वासाला पात्र राहून आम्ही काम केलं आहे. हा विश्वास घालवू नका एवढंच मी सांगतो,” असेही रामराजे यावेळी म्हणाले.
पुढे रामराजेंनी विधानसभा निवडणूक निकालावर भाष्य करत म्हंटले की, तुम्ही निवडणुकीची चर्चा कशाला करता? फार काय आक्रित झालं नाही. सत्ता नसताना जे कार्यकर्ते टिकतात तेच खरे कार्यकर्ते असतात. सत्तेचा उपभोग घेणारेच गेले. जाणाऱ्यांचे नावही घेऊ नका. आता आपणाला आपली दिशा पकडायची आहे. तुम्ही फक्त एकत्र रहा. दमबाजीला घाबराल तर राजकारण होणार नाही. लढाईच्या तयारीनेच आपण सुरुवात केली आहे.”
“जनतेने आमच्यावर गेली ३० वर्षांपासून जो विश्वास टाकला आहे. तो विश्वास मात्र तेवढा घालवू नका, एवढीच तुम्हाला विनंती आहे. राज्यात आपण मतं मिळवायला कमी पडलो आहोत, पण कामांमध्ये आपण कुठेही कमी पडलो नाही. त्या कामाची मते मिळविण्यात आम्ही कमी पडलेलो आहोत. राज्यातील दोन मोठे पक्ष आपल्या विरोधात होते,” असेही रामराजे निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.
भाजपचे माजी खासदार रणजित निंबाळकर आणि मंत्री जयकुमार गोरे हे रामराजे निंबाळकरांचे कट्टर राजकीय वैरी मानले जातात. त्यादृष्टीने अप्रत्यक्षरित्या रामराजे निंबाळकरांनी हा इशारा दिल्याची देखील चर्चा आहे.