
कराड : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा संभाजी ब्रिगेडकडून एकेरी उल्लेख थांबवावा या मागणीसाठी शिवधर्म फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दीपक अण्णा सिताराम काटे यांनी तहसीलदार कल्पना ढवळे यांना निवेदन दिले आहे. जर संभाजी ब्रिगेड कडून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख थांबला नाही तर शिवधर्म फाउंडेशन कडून मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र व स्वराज्याचे दुसरे छत्रपती आहेत. त्यांची ख्याती जग विख्यात आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे हिंदू धर्म प्रती जे बलिदान आहे ते जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत विसरले जाणार नाही. म्हणून रयतेने त्यांना धर्मवीर ही उपाधी दिली आहे. आणि आज संभाजी ब्रिगेड सारखी संघटना त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करते ही गोष्ट अखंड महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. संभाजी ब्रिगेडच्या कुठल्याही कामाचे सोशल मीडियामध्ये असेल किंवा जन माणसांमध्ये असेल चर्चा करत असताना जो पहिला उद्धार निघतो तो संभाजी ब्रिगेड असा आहे. त्यामुळे कळत नकळत रोज लाखो करोडो लोकांकडून आपल्या राजाचा एकेरी उल्लेख होत आहे. तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील करोडो शंभूराजे प्रेमींच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की एक तरी संभाजी ब्रिगेड संघटना व संभाजी ब्रिगेड पक्ष यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव बदलण्याचे आदेश द्यावे अन्यथा या संघटना व पक्ष यांचे धर्मादाय आयुक्त मार्फत परवाने रद्द करावे असे दिलेले निवेदनात म्हटले आहे.