
कराड : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यात चुकीच्या पध्दतीने कामकाज सुरू आहे. हा कारखाना सभासदांचा राहिलेला नाही तर पीता पूत्रांच्या मालकीचा झाला आहे. कारखान्यातील एकाधिकारशाहीविरोधात शेतकरी सभासदांमध्ये प्रचंड रोष असून यावेळी सह्याद्रि साखर कारखान्यात सभासद परिवर्तन घडवून विद्यमान चेअरमन यांना घरी बसविणार, असा विश्वास कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
सह्याद्रि साखर कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असून मंगळवारी त्यांच्या गटातील उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यावेळी आ.घोरपडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आ.घोरपडे म्हणाले, कारखान्यासाठी अर्ज भरले आहे.आजपर्यंत सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सत्ताधार्यांकडून झाला. यावेळी विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज भरण्याची ही पहिलीच वेळ आहे. सभासद उत्स्फूर्तपणे या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात जमा झाले आहेत. यावेळी चेअरमन सर्वसामान्य शेतकर्यांमधून निवडण्याचा संकल्प सभासदांनी केला आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व आपली काय कमराबंद चर्चा झाली या प्रश्नावर बोलताना आ. घोरपडे म्हणाले, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, रयत संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजपा आम्ही सर्व एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून विद्यमान चेअरमन यांना घरी बसविण्यासाठी जे काही करावे लागेल त्या प्रमाणे नियोजन सुरू आहे. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे नेते आहेत. त्यांना मानणारे सभासद अधिक आहेत. त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांची भेट घेतली आहे. विधानसभेला ज्या प्रध्दतीने आम्ही एकसंघ निवडणुकीला समोरे गेलो आणि मोठा विजय मिळविला त्या पध्दतीचे नियोजन यावेळीही केले आहे. सह्याद्रिचे कार्यक्षेत्र असणार्या पाच तालुक्यात आम्ही नियोजन केले आहे. एकास एक लढत देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
पृथ्वीराज चव्हाण यांनी आपणाला काही शब्द दिला आहे काय या प्रश्नावर आ. घोरपडे म्हणाले, ज्या दिवशी सह्याद्रि कारखान्याचा निकाल लागेल त्यावेळी लक्षात येईल असे सूचक वक्तव्य करत आम्ही सगळे सोबत आहोत, असे आ.घोरपडे म्हणाले.
सह्याद्रिचे विस्तारीकरण चुकीच्या पध्दतीने…
सह्याद्रि कारखान्याचे विस्तारीकरण तीन वर्षानंतरही पूर्ण झालेले नाही. इतर साखर कारख्यांचे अडीचशे कोटीमध्ये विस्तारीकरण एक वर्षात झाले आहे. या ठिकाणी मात्र त्याच गोष्टीसाठी 480 कोटी रूपये खर्च झाला आहे. कारखान्याच्या सभांमधून या बाबी आम्ही सभासदांच्या निदर्शनास आणून देऊ. हे विस्तारीकरण अयोग्य झाले आहे. आम्ही खटाव -माण साखर कारखाना उभा केला.त्यावेळी पायाभरणीपासून अकराव्या महिन्यामध्ये साखरेचे उत्पादन घेतले. सह्यादिच्या विस्तारीकरणासाठी 418 कोटी प्राथमिक दिसत असले तरी ते साडेपाचशे सहाशे कोटीपर्यंत खर्च गेला आहे. सह्याद्रि कारखान्यावरील कर्जाचा बोजा कमी करून शेतकरी सभासदांना चांगला दर देण्यासाठी नवीन संचालक काम करतील, असा विश्वासही आ.घोरपडे यांनी व्यक्त केला.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या चौथ्या दिवशी ९१ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आज दाखल झालेल्या अर्जामध्ये एक नंबर गटात आज पाच एकुण सात, दोन नंबर गटात नऊ, तीन नंबर गटात आठ, चार नंबर गटात २१, पाच नंबर गटात आज १३ आणि आजअखेर १४, सहा नंबर गटात १८, महिला गटात पाच, राखीव गटात १२ असे ९१ उमेदवारी अर्ज आज दाखल झाले. आजपर्यंत ९४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.