देशमुख हत्येच्या विरोधाआडून शिंदेसेनेचा राष्ट्रवादीला शह; दोषींना फाशीची मागणी

पुणे : राज्यात गाजत असलेल्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावरून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने मंगळवारी आंदोलन केले. राज्याच्या ठाणे व अन्य जिल्ह्यातही शिंदेसेनेच्या वतीने असेच आंदोलन करण्यात आले.
पक्षाच्या मुख्यालयातूनच आंदोलन करण्याचे आदेश दिले गेले होते अशी माहिती मिळाली. त्यात वाल्मिक कराड याच्या नावाचा उल्लेख करत आरोपींनी फाशीची शिक्षेची मागणी करण्यात आली.
पुण्यात केळकर चौकात पक्षाच्या शहर शाखेने मंगळवारी दुपारी १ वाजता आंदोलन केले. या घटनेच्या आडून शिंदेसेनेचा राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न असलेल्यी चर्चा राजकीय वर्तूळात सुरू झाली आहे. याच प्रकरणावरून वारंवार आरोप होत असलेले धनंजय मुंडे यांनी आजच आपल्या पदाचा राजीनामा दिला व त्यानंतर लगेचच ही आंदोलने सुरू झाली. केळकर चौकात दुपारी १ वाजता हातात भगवे झेंडे घेतलेले शिवसैनिक जमा होण्यास सुरूवात झाली.
शहरप्रमुख नाना भानगिरे तसेच निलेश गिरमे, दत्ता खवळे, सचिन थोरात, प्रमोद त्रिभूने, दर्शना त्रिभूने अमर घुले, निलेश माजिरे व अन्य शिवसैनिक त्यात होते. त्यांनी घोषणा सुरू केल्या. संतोष देशमुख हत्येचा मुख्य सुत्रधार वाल्मिक कराड व सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असे लिहिलेला मोठा फलक काहीजणांनी हातात धरला होता. नाना भानगिरे यांनी आपल्या भाषणात या हत्येची सोमवारी समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या छायाचित्रांचा उल्लेख केला. इतकी क्रूर हत्या करणाऱ्यांना चौकात उभे करून फाशी द्या अशी मागणी त्यांनी केली. वाल्मिक कराड यांच्या नावाचा उल्लेखही त्यांनी केला.
भाषणामध्ये भानगिरे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल काहीही भाष्य केले नाही, मात्र राजकीय आश्रय असल्याशिवाय गुन्हेगारांना बळ मिळत नाही. याही प्रकरणात तसा आश्रय असल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, आरोपी कोणाचेही कार्यकर्ते असले तरी त्यांची हयगय करू नये, त्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत असे ते म्हणाले. संतोष देशमूख यांची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करणाऱ्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
राज्यातील सत्तेत सहभागी असूनही काही दिवस बॅकफूटवर गेलेल्या शिंदेसेनेने या प्रकरणाची संधी साधली असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला भारतीय जनता पक्षाकडून सत्तेत जास्त महत्व दिले जात होते. मात्र अजित पवार यांचे निकटचे सहकारी असलेले धनंजय मुंडे यांच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणात सातत्याने आरोप होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, भाजपचे आमदार सुरेश धस मुंडे यांच्यावर थेट टीका करत आहेत. त्यामुळेच अखेर मुंडे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत आली आहे. त्याचाच फायदा उचलण्याचा प्रयत्न या आंदोलनांच्या माध्यमातून शिंदे सेना करत असल्याचे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे.