
कराड : आगाशिवनगर येथील दहा कुटुंबांना सुमारे 40 वर्षानंतर प्राधान्य जन कुटुंब रेशन कार्ड योजनेअंतर्गत शिधापत्रिका मिळाली. कराड कोल्हाटी समाज संघटनेचे अध्यक्ष सनी दिलीप जावळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या हस्ते या शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले. शिधापत्रिका मिळताच लाभार्थी भारावून गेले.
संबंधित कुटुंबे भटके विमुक्त समाजातील आहेत. गेली 40 वर्षे ते शिधापत्रिकेपासून वंचित होते. अध्यक्ष सनी जावळे यांना ही माहिती समजतात त्यांनी तहसील कार्यालयात पुरवठा शाखेत संपर्क साधला. सनी जावळे यांनी पाठपुरावा करून पुरवठा शाखेच्या अधिकारी साहीला नायकवडी यांच्याशी चर्चा करून शिधापत्रिका देण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी नायकवडी यांनी गरजू लोकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवू, या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही लागेल ती मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. शिधापत्रिकेच्या मागणीची दखल घेऊन आगाशिवनगर येथील कोल्हाटी समाजातील महिलांना प्राधान्य जन कुटुंब रेशन कार्ड तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष सनी जावळे, सुनील जावळे, किरण कुडाळकर, अनिता पाटणकर, समर्थ जावळे, बाबा जावळे, दीपक जावळे, संगीता कुडाळकर, मयुरी जावळे, रेश्मा लाखे, किरण कुडाळकर, सचिन जावळे उपस्थित होते.
शिधापत्रिका नसल्याने घरकुल व इतर शासकीय योजनांचा लाभ मिळत नव्हता. मात्र, शिधापत्रिका मिळाल्याने त्या सर्व शासकीय योजनांचा त्यांना लाभ मिळणार आहे. नव्याने आलेल्या घरकुल योजनेचा ही त्यांना लाभ मिळणार आहे. शिधापत्रिकेमुळे घरकुल मिळत असल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.