
कराड :- समाज बुद्धीने सशक्त होण्यासाठी वाचन संस्कृती भक्कम करणे गरजेचे आहे. वाचन संस्कृती होण्यासाठी नवनवीन लेखक निर्माण व्हावेत. त्यांनी लिखाण केले तर वाचनालय उभारली जातील, त्यातून उद्याची भावी पिढी निर्माण होईल आणि समाज भक्कम होईल. वाचनालये आणि लेखकांना उभ करण्यासाठी समाजातील राजकीय- सामाजिक घटकांनी मदत करणे गरजेचे आहे. अभयकुमार देशमुख यांची कारखाना कादंबरी सहकार क्षेत्रातील माहिती येणाऱ्या कित्येक पिढ्यांना देत राहील, असा विश्वास भाजपा प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ यांनी व्यक्त केला.
विद्यानगर येथील समाजभूषण बाबुराव गोखले ग्रंथालयात लेखक अभयकुमार देशमुख लिखित “कारखाना” ही कादंबरी कराड तालुक्यातील वाचनालयांना भेट देण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रामकृष्ण वेताळ बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक पत्रकार दीपक पवार, वाचनालयाच्या अध्यक्षा कांचन धर्मे, उपाध्यक्ष प्रा. दादाराम साळुंखे, सूर्यमाला जाधव, विशाल पाटील यांच्यासह तालुक्यातील वाचनालयाचे ग्रंथपाल व वाचक उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार म्हणाले, लेखकाच्या लिखाणातून समाज घडत असतो. आज-काल तरुण-तरुणी सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टींचे आकलन लवकर करतात. त्यामुळे पुढील पिढी घडण्यासाठी लेखकांनी समाज प्रबोधनपर लिहिणे आणि ते वाचलं जाणं गरजेचं आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दादाराव साळुंखे यांनी केले. आभार मुख्याध्यापक दीपक पवार यांनी मानले.
रामकृष्ण वेताळ यांचे दातृत्व
लेखक अभयकुमार देशमुख यांची “कारखाना” कादंबरी कराड तालुक्यातील वाचकांना उपलब्ध व्हावी. तसेच ग्रंथालयांतील ग्रंथ साहित्यात वाढ व्हावी, यासाठी भाजपा प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ यांनी स्वखर्चाने या कादंबऱ्या ग्रंथालयांना भेट दिल्या.