राज्यसातारा

रेठरे बुद्रुकच्या तीन कर्तृत्ववान भगिनींचा हृदयस्पर्शी सन्मान; माहेरच्या मातीने दिला प्रेमाचा अनमोल ठेवा

कराड : राजकारण, न्यायव्यवस्था आणि साहित्य क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या रेठरे बुद्रुकच्या तीन कर्तृत्ववान माहेरवाशिणी भगिनींचा ग्रामस्थांनी केलेला भव्य नागरी सत्कार हा केवळ एका कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता माहेरच्या मातीने आपल्या लेकींच्या कर्तृत्वाला दिलेली प्रेमाची पावती आणि संपूर्ण गावाच्या अस्मितेचा अभिमानाचा क्षण ठरला. माजी खासदार ॲड. वंदनाताई चव्हाण, मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती सौ. रेवती मोहिते-डेरे आणि सुप्रसिद्ध लेखिका, वीरपत्नी विनिता अशोक कामटे या तिन्ही भगिनींचा सन्मान होत असताना ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरचा अभिमान आणि भगिनींच्या डोळ्यांतील भावूकता या सोहळ्याला विलक्षण उंची देऊन गेली.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते तसेच आमदार डॉ. अतुलबाबा भोसले आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात फेटा, शाल, श्रीफळ, मानपत्र, रेठरे बासमती तांदूळ, रेठरा पेढा आणि रेठरा तूप देऊन तिन्ही भगिनींचा गौरव करण्यात आला. मात्र या सत्काराची खरी श्रीमंती भेटवस्तूंमध्ये नव्हती; ती होती गावकऱ्यांच्या मनात आपल्या लेकींबद्दल असलेल्या अभिमानात, प्रेमात आणि आपुलकीत. जन्मभूमीशी आणि माहेरच्या मातीशी असलेली नाळ कितीही वर्षे, कितीही अंतर आणि कितीही मोठे पद आले तरी तुटत नाही, याचा जिवंत प्रत्यय या सोहळ्यातून आला.

माजी खासदार ॲड. वंदनाताई चव्हाण यांच्या निधीतून साकारलेल्या कृष्णाघाटाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आणि कृष्णा विश्व विद्यापीठातील कार्यक्रमाच्या निमित्ताने तिन्ही भगिनी रेठरे बुद्रुकमध्ये एकत्र आल्या. कृष्णेच्या काठावर बालपणीच्या आठवणींमध्ये रमलेल्या या भगिनींच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याची संधी ग्रामस्थांनी सोडली नाही. ज्या गावच्या मातीत बालपणाची पावले उमटली, ज्या नदीकाठी बालपणाचा आनंद घेतला आणि ज्या घरातून संस्कारांची शिदोरी मिळाली, त्याच गावाने आज आपल्या लेकींच्या कर्तृत्वाला डोक्यावर घेतले, हा क्षण प्रत्येक ग्रामस्थासाठी अभिमानाचा ठरला.

सत्काराला उत्तर देताना ॲड. वंदनाताई चव्हाण यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देताच वातावरण भावूक झाले. चुलत भावंडांसोबत शेतात जाणे, शेजाऱ्यांकडे पोहे खाणे, वडिलांसोबत मंदिर आणि नदीकाठी जाणे, कृष्णेच्या पाण्यातील बालपणाचा आनंद घेणे या आठवणी त्यांनी सांगितल्या. “आम्ही पुण्यात वाढलो असलो तरी आम्ही रेठरे बुद्रुकच्या आहोत, हे अभिमानाने सांगतो,” या भावनेतून त्यांनी आपल्या माहेरच्या मातीशी असलेले नाते व्यक्त केले. ज्या नदीचा बालपणी आनंद घेतला, त्याच नदीवर घाट उभारण्याचे भाग्य मला लाभले, ही भावना त्यांच्या शब्दांतून व्यक्त होताच उपस्थितांच्या मनालाही स्पर्शून गेली.

या सत्कारामागील सर्वात मोठी प्रेरणा म्हणजे गावातील एकी, परस्पर सहकार्य आणि पुढच्या पिढीला कर्तृत्वाची प्रेरणा देण्याची दूरदृष्टी होय. आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना ग्रामस्थांचे सहकार्य लाभत असून, गावाचा सर्वांगीण विकास करताना गावाची अस्मिता, एकजूट आणि कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान यांना महत्त्व देण्याची भूमिका या सोहळ्यातून अधोरेखित झाली. केवळ विकासकामे करणे नव्हे, तर गावाला जोडणारी माणसे जोडणे, गावासाठी योगदान देणाऱ्यांची कृतज्ञतेने आठवण ठेवणे आणि त्यांच्या कार्याचा सन्मान पुढील पिढीसमोर आदर्श म्हणून ठेवणे, हा या उपक्रमामागील व्यापक हेतू असल्याचे प्रकर्षाने जाणवले.

डॉ. सुरेश भोसले यांनीही तिन्ही भगिनींच्या कर्तृत्वाचा गौरव करताना, त्या रेठरे बुद्रुकच्या आहेत हीच गावासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. मुलींना शिक्षण, संधी आणि प्रोत्साहन मिळाले तर त्या कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च स्थान गाठू शकतात, हा संदेश या सत्कारातून समाजासमोर आला. कृष्णा समूहाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती आणि महिलांना संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला. गावातील मुलींच्या स्वप्नांना पंख देणे, त्यांना थांबविण्याऐवजी पुढे जाण्यासाठी हात देणे आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणे, हीच खरी सामाजिक प्रगती, अशी भावना या कार्यक्रमातून पुढे आली.

डॉ. इंद्रजित मोहिते यांनी राजकारण, न्यायव्यवस्था आणि लेखन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत तिन्ही भगिनींनी उमटविलेला ठसा अधोरेखित केला. चांगले संस्कार, शिक्षण आणि कुटुंबाचे पाठबळ मिळाल्यास मुली कोणत्याही क्षेत्रात यशाचे शिखर गाठू शकतात, हे या तिन्ही भगिनींच्या प्रवासातून सिद्ध होते. स्वतःच्या गावातील कर्तृत्वाचा सन्मान करण्याची परंपरा जपणे, गावासाठी विविध माध्यमातून योगदान देणाऱ्या व्यक्तींना कृतज्ञतेने स्मरणात ठेवणे आणि अशा व्यक्तींच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा देणे, हा या कार्यक्रमाचा खरा संदेश ठरला.

सरपंच हणमंत सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. स्नेहल राजहंस यांनी मानपत्राचे वाचन केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. जि. प. सदस्य सौ. प्रियांका साळुंखे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला ॲड. हेमंत चव्हाण, राहुल कामटे, जि. प. सदस्य शैलजा शिंदे, पं. स. सभापती नंदाताई यादव, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनावले, कराडचे नगरसेवक शिवाजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सांगली महिला जिल्हाध्यक्ष सौ. सुश्मिता जाधव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रेठरे बुद्रुकच्या तीन लेकींच्या कर्तृत्वाला माहेरच्या मातीने दिलेली ही मानवंदना गावाच्या अस्मितेची, एकीची आणि कृतज्ञतेची सुंदर परंपरा निर्माण करणारी ठरली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close