राज्यसातारा

निलेश जाधवांच्या एक महिना दहा दिवसांच्या कार्यकाळातच हजेरीपत्रकात ‘P’ची फेरनोंद? आधी फक्त आडव्या खुणा; पुरावे समितीसमोर, आता ‘हे कोणी केले?’चा स्पष्ट अहवाल द्यावाच लागणार!

विश्व सिटी न्यूज विशेष वृत्त मालिका भाग - बावन्नावा

कराड : कराड तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागांतर्गत शासकीय धान्य गोदामातील टोळी क्रमांक ९६ मधील हजेरीपत्रकाचा मुद्दा आता गोदाम व्यवस्थापक निलेश जाधव यांच्या कार्यकाळाभोवती अधिकच गंभीर बनला आहे. संबंधित सुनील विठ्ठल पगडे यांच्या नावापुढील हजेरी नोंदी तपासल्या असता, निलेश जाधव यांच्या कार्यकाळापूर्वीच्या नोंदींमध्ये गैरहजेरीच्या ठिकाणी केवळ आडव्या रेषा दिसतात; मात्र निलेश जाधव यांच्या कार्यकाळातील फेब्रुवारी महिन्यापासून मार्चच्या १० तारखेपर्यंतच्या कालावधीतच त्या जागांवर ‘P’ अक्षर दिसत असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे हा प्रकार नेमका कोणी आणि कोणत्या कारणाने केला, हा प्रश्न आता थेट चौकशी समितीसमोर उभा ठाकला आहे.

या प्रकरणाचे महत्त्व केवळ ‘P’ अक्षर दिसते एवढ्यापुरते मर्यादित नाही. पूर्वीच्या संपूर्ण कालावधीतील हजेरीपत्रकांमध्ये संबंधित ठिकाणी आडव्या रेषा असताना, फक्त एका महिना दहा दिवसांच्या कालावधीतच त्या जागेवर ‘P’ अक्षर कसे आले, हा मुख्य सवाल आहे. जर ही केवळ नियमित हजेरी नोंद असेल, तर पूर्वीच्या महिन्यांमध्येही त्याच पद्धतीने ‘P’ अक्षर असणे अपेक्षित होते. मात्र, तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार पूर्वीच्या नोंदींमध्ये तशी परिस्थिती दिसत नसून, बदलाचा कालावधी नेमका निलेश जाधव यांच्या कार्यकाळाशी जुळत असल्याने त्यांच्या कार्यकाळातील हजेरीपत्रक आता संशयाच्या केंद्रस्थानी आले आहे.

तक्रारदारांनी या बाबी केवळ तोंडी मांडलेल्या नसून, हजेरीपत्रकातील संबंधित आडव्या खुणा, त्यानंतर दिसणारे ‘P’ अक्षर आणि कालावधीतील फरक यांचे पुरावे चौकशी समितीसमोर तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासमोर सादर केले आहेत. त्यामुळे चौकशी समितीसमोर आता महत्त्वाचा प्रश्न हा नाही की ‘P’ अक्षर दिसते की नाही; तर ते अक्षर नेमके कोणी लिहिले आणि आधीची नोंद बदलली असल्यास ती कोणाच्या जबाबदारीत बदलली, हा आहे.

जर हा बदल निलेश जाधव यांनी केलेला नसेल, तर मग मुकादम किंवा अन्य कर्मचाऱ्यांनी तो केला असण्याची शक्यता समितीने तपासावी. मात्र, असा बदल इतर कर्मचाऱ्यांनी केला असेल तर एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो त्यांनी मागील सर्व महिन्यांच्या हजेरीपत्रकात अशाच पद्धतीने ‘P’ची नोंद का केली नाही? फक्त निलेश जाधव यांच्या कार्यकाळातील फेब्रुवारी आणि मार्चच्या १० तारखेपर्यंतच्या नोंदींमध्येच हा बदल कसा झाला? हा योगायोग आहे की विशिष्ट कालावधीतील नोंदींमध्येच करण्यात आलेला बदल, याचे उत्तर समितीने शोधणे आवश्यक आहे.

कारण एखाद्या कर्मचाऱ्याने स्वतःच्या पद्धतीने हजेरीपत्रकात फेरनोंद केली असेल, तर ती पद्धत केवळ एका विशिष्ट व्यवस्थापकाच्या कार्यकाळापुरती मर्यादित राहण्याचे कारण काय? जर मुकादम अथवा अन्य कर्मचाऱ्यांनी हा प्रकार केला असेल, तर त्यांच्या हातून मागील महिन्यांतील हजेरीपत्रकांमध्येही त्याच स्वरूपाच्या नोंदी अपेक्षित होत्या. त्या नोंदी नसतील, तर फक्त निलेश जाधव यांच्या कार्यकाळातील हजेरीपत्रकातच ‘P’ का दिसते, हा प्रश्न अधिक तीव्र होतो. त्यामुळे या कालावधीतील नोंदी आणि संबंधित व्यक्तींची जबाबदारी यांचा थेट संबंध तपासणे आवश्यक आहे.

आता चौकशी समितीने “P अक्षर दिसते, मात्र ते कोणी लिहिले हे सांगता येत नाही” अशा प्रकारचा अस्पष्ट अहवाल देणे टाळले पाहिजे. कारण असा अहवाल दिल्यास मूळ प्रश्नच अनुत्तरित राहणार आहे. तक्रारदारांनी समितीसमोर पुरावे सादर केलेले असताना, नोंद नेमकी कोणी केली याबाबत जबाबदारी निश्चित न करणे म्हणजे चौकशीचा महत्त्वाचा भाग अपूर्ण ठेवण्यासारखे ठरेल. उलट, अशा प्रकारचा अहवाल दिल्यास संबंधित अधिकाऱ्याला जबाबदारीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय निर्माण होऊ शकतो.

या प्रकरणात आता निलेश जाधव यांच्या एक महिना दहा दिवसांच्या कार्यकाळातील हजेरीपत्रक आणि त्यापूर्वीच्या नोंदी यांची तुलना हाच सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरत आहे. पूर्वी फक्त आडव्या रेषा आणि त्यानंतर विशिष्ट कालावधीतच ‘P’ दिसत असेल, तर या बदलाचे मूळ शोधणे चौकशी समितीची जबाबदारी आहे. पुरावे समोर असताना जर निलेश जाधव यांना वाचविणारा किंवा “हे कोणी केले सांगता येत नाही” अशा स्वरूपाचा अहवाल देण्यात आला, तर चौकशी समितीच्या निष्पक्षतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. अशा परिस्थितीत वरिष्ठ कार्यालयाकडे समितीच्या अहवालाविरोधात तक्रार करून समितीने पुराव्यांचा विचार कसा केला, निष्कर्ष कोणत्या आधारावर काढला आणि जबाबदारी निश्चित का केली नाही, याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात येईल, असा इशारा तक्रारदारांनी दिला आहे.

हजेरीपत्रकात ‘P’ आहे, पण ‘P’ करणारा कोण? हा प्रश्न अनुत्तरित ठेवून चौकशी संपणार नाही. निलेश जाधवांचा कार्यकाळ असो किंवा अन्य कर्मचाऱ्यांची भूमिका ज्याने केले त्याचे नाव आणि जबाबदारी अहवालात स्पष्ट आलीच पाहिजे; अन्यथा ‘P’च्या आडून सत्य लपविण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय अधिकच बळावणार आहे!

चौकशी समितीसमोर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न ‘P’ अक्षर नेमके कोणी लिहिले? हा आहे. जर समितीच्या अहवालात निलेश जाधव यांनी हे अक्षर लिहिले नसल्याचे अथवा त्यांच्या विरोधात याबाबत ठोस पुरावा नसल्याचे नमूद करण्याचा प्रयत्न केला, तर त्यासाठी समितीने नेमका कोणता आधार घेतला, हे स्पष्ट करावे लागेल. निलेश जाधव यांनी ‘P’ लिहिले नाही, हे समितीने कोणत्या पुराव्यावरून ठरविले? आणि जर निलेश जाधव यांनी लिहिले नाही असे समिती म्हणत असेल, तर मग हे अक्षर नेमके कोणी लिहिले, याचे उत्तरही त्याच अहवालात असणे आवश्यक आहे. केवळ ‘P’ अक्षर दिसते, मात्र ते कोणी लिहिले हे निश्चित करता येत नाही, असा निष्कर्ष काढून चौकशी संपविणे म्हणजे मूळ प्रश्नच अनुत्तरित ठेवण्यासारखे आहे. ज्याच्यावर संशय निर्माण करणारे पुरावे समितीसमोर सादर झाले आहेत, त्याला दोषी ठरवायचे असेल तर पुरावा हवा आणि निर्दोष ठरवायचे असेल तरी त्याचा आधार हवा. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या बचावासाठी अनुमानाधारित निष्कर्ष नोंदवू नये; ‘P’ची नोंद कोणी केली याबाबत चौकशी समितीने स्पष्ट, ठोस आणि जबाबदारी निश्चित करणारा निष्कर्षच अहवालात द्यावा, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.

पुढील भागात – पुरवठा निरीक्षण अधिकारी व तहसीलदार यांनी हजेरी पत्रकावरती सह्या केल्या नसत्या तर पगार जमा झाला असता का याबाबत

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close