
मुंबई : प्रलंबित मागण्यासाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचं मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. बुधवारी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने आझाद मैदानावर अंगणवाडी सेविका, कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली.
अशातच बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावर जाऊन आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविकांची भेट घेतली. मात्र, मुख्यमंत्र्यांसोबतची चर्चा निष्फळ ठरली असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय अंगणवाडी सेविकांनी घेतला आहे.
विविध प्रलंबित मागण्यासाठी बुधवारी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्तानं मुंबईतील आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी आंदोलनाला सुरुवात केली. अंगणवाडी सेविकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आंदोलनकर्त्या अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची भेट झाली. बुधवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अंगणवाडी सेविकांमध्ये चर्चा झाली, मात्र मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत कोणतेही चांगले पाऊल उचलले गेले नसल्याचा आरोप अंगणवाडी सेविकांनी केला आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही अंगणवाडी सेविका आंदोलनावर ठाम असून आज दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच ठेवणार आहेत. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन संपणार नाही, आंदोलन सुरूच राहणार असल्याचं अंगणवाडी सेविकांनी सांगितलं आहे.