राज्यसातारा

अधिवेशनात आमदार अतुल भोसले यांचा धडाडता सवाल, मलकापूरच्या अपूर्ण प्रशासकीय इमारतीला न्याय कधी मिळणार..?

कराड : मलकापूर शहराच्या विकासाचा कणा ठरणाऱ्या अपूर्ण प्रशासकीय इमारतीचा मुद्दा कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी विधिमंडळाच्या सभागृहात अत्यंत प्रभावी आणि ठाम शब्दांत उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधले. तब्बल सात वर्षांपासून केवळ निधीअभावी रखडलेली ही इमारत आजही अपूर्ण अवस्थेत उभी आहे, ही बाब त्यांनी अत्यंत खेदाने मांडली. अत्यल्प आणि किरकोळ काम शिल्लक असताना प्रकल्प ठप्प पडणे हे केवळ शासकीय दिरंगाईचे उदाहरण नसून शहराच्या विकासाला बसलेला ब्रेक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मलकापूरच्या जनतेच्या सोयीसाठी उभारण्यात आलेली ही प्रशासकीय इमारत पूर्णत्वास गेल्यास शहराच्या प्रशासनाला नवे बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विविध शासकीय विभाग सध्या विखुरलेल्या स्वरूपात कार्यरत असल्याने नागरिकांना कामासाठी अनेक ठिकाणी जावे लागते, वेळ आणि श्रम वाया जातात. सर्व विभाग एकाच छताखाली कार्यरत राहिल्यास प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक बनेल, तसेच नागरिकांचा शासनावरील विश्वास अधिक दृढ होईल, असे त्यांनी अधोरेखित केले.

डॉ. भोसले यांची भूमिका केवळ प्रश्न उपस्थित करण्यापुरती मर्यादित नसून, विकासाला गती देण्याच्या त्यांच्या सातत्यपूर्ण धडपडीची ती साक्ष आहे. मलकापूर नगरपालिकेच्या सर्वांगीण उन्नतीसाठी ते सातत्याने निधी मिळविणे, प्रलंबित कामे मार्गी लावणे आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी प्रयत्नशील आहेत. सभागृहातील त्यांची प्रभावी मांडणी ही मलकापूरकरांच्या अपेक्षा आणि आशांचा ठोस आवाज ठरला.

या इमारतीचे पूर्णत्व म्हणजे केवळ कार्यालयीन जागेची उभारणी नव्हे, तर एक सुसज्ज प्रशासकीय मुख्यालयाची निर्मिती आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचा दूरदृष्टीपूर्ण प्रस्तावही त्यांनी मांडला. ज्येष्ठ नागरिकांसाठी आरामदायी बसण्याची व्यवस्था, नागरिकांसाठी सुरक्षित व आकर्षक वॉकिंग ट्रॅक, हरित पट्टा आणि सुशोभीकरणाची कामे यामुळे हा परिसर नागरिकांसाठी प्रेरणादायी आणि आरोग्यदायी ठरेल, अशी संकल्पना त्यांनी मांडली.

निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात आल्यास हे काम अल्पावधीत पूर्ण होऊ शकते, असे सांगत त्यांनी शासनाला सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले. अत्यल्प खर्चात मोठा परिणाम साधता येईल आणि मलकापूर शहराला एक सुसज्ज, आधुनिक व नागरिकाभिमुख प्रशासकीय केंद्र मिळेल, हा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मलकापूरच्या विकासासाठी जिद्द, दृष्टी आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा या त्रिसूत्रीच्या जोरावर डॉ. अतुलबाबा भोसले कार्यरत असल्याचे या विषयातून स्पष्ट झाले. अपूर्ण प्रशासकीय इमारतीला पूर्णत्व देण्याचा त्यांचा प्रयत्न हा केवळ बांधकामाचा प्रश्न नसून, शहराच्या प्रगतीचा, सुव्यवस्थेचा आणि भविष्यातील विकासदिशेचा पाया मजबूत करण्याचा निर्धार आहे. मलकापूरकरांच्या अपेक्षांना न्याय देणारी ही लढाई यशस्वी व्हावी, अशीच सर्वसामान्यांची भावना व्यक्त होत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close