
कराड ः समाज माध्यमांचा चुकीचा वापर हा समाजात गुन्हेगारी वाढवत आहे. नागरिकांनी यासाठी सतत सजग राहिले पाहिजे व प्रसारमाध्यमांचा गैरवापर टाळून मुले व स्त्रियांच्या अत्याचार विरुद्ध उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी केले.
महाराष्ट्र पोलीस दल सातारा जिल्हा, निर्भया पथक कराड, पोलीस चौकी मलकापूर, श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. जखिणवाडी व श्री मळाईदेवी शिक्षण संस्था मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला अत्याचार जनजागरण रॅली व मेळावा शनिवारी आदर्श जुनिअर कॉलेज मलकापूर येथे संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
गेल्या अनेक वर्षात मुली व महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे. मुली व महिला घरी, ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी, शाळामध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये, अगदी परिचितांकडून ही सुरक्षित नाहीत. इंस्टाग्राम, युट्युब, फेसबुक इत्यादी समाज माध्यमांच्या माध्यमातून कमी वयातील मुले, मुली, तरुण पिढी विकृतींना बळी पडत आहे. सुसंस्कृत समाजातील पुरुष वर्गालाही लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारच्या घटना सध्या घडत आहेत. पोक्सो सारख्या कायद्याअंतर्गत येणाऱ्या चाईल्ड पॉर्नोग्राफी साईट पाहणे हा सुद्धा गंभीर गुन्हा मानला आहे. अल्पवयीन मुली व महिला वर्गांची सुरक्षितता आपल्या संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे असा संदेश या जनजागरण रॅली व मेळाव्यातून मलकापूरच्या सजग नागरिकांनी दिला आहे.
सदर रॅली आदर्श ज्युनिअर कॉलेज पासून प्रारंभ होऊन मलकापूर दत्त मंदिर, आदर्श प्राथमिक विद्यालय, मार्केट यार्ड रोड, कन्या शाळा, मलकापूर लक्ष्मी नगर, गजानन मंदिर, व मुख्य रस्ता मार्गे, जाऊन आदर्श ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणामध्ये या रॅलीचा जनजागरण मेळावा संपन्न झाला.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे म्हणाले, कोणती ही घटना घडण्यापूर्वी किंवा अशी घटना घडू नये नाही यासाठी समाजाचे जनजागरण करीत आहे व कायम कर्तव्यदक्ष राहिल, असा संदेश दिला.
श्री मळाई ग्रुपचे अध्यक्ष शेतीमित्र अशोकराव थोरात म्हणाले, भारतीय संस्कृती ही स्त्रियांना सन्मान देणारी आहे. मुली आणि स्त्रियांवरील कोणताही अत्याचार आपल्या परिसरात घडू नये यासाठी मलकापूर, नांदलापूर, आगशिवनगर जखिणवाडी,कापील,गोळेश्वर येथील सजग नागरिकांच्या “महिला अत्याचार जनजागरण रॅली व मेळाव्याचे“ आयोजन करण्यात आले होते असे सांगितले.
या मेळाव्यासाठी जवळपास 1500 पर्यंत विद्यार्थी पालक शिक्षक उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.
रॅलीचे उद्घाटन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रेखा देशपांडे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. संगीत शिक्षक तांबवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, आदर्श जुनियर कॉलेजच्या अनिरुद्ध मोरे या विद्यार्थ्यांने सादर केलेल्या“ त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी“या आर्त व भेदक गीताने उपस्थित त्यांचे डोळे पानावले.
मलकापूर परिसरामध्ये मुली व मुली व महिलावरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत व अशा प्रवृत्ती समाजातून हद्दपार करण्यासाठी श्री मळाई महिला विकास मंच नेहमी प्रयत्न करीत राहिल असे आश्वासन श्री मळाई महिला विकास मंचच्या कार्याध्यक्षा डॉ. स्वाती थोरात यांनी दिले. यावेळी रोटरी क्लब, इनरव्हील क्लब मलकापूर यांनी पाठिंबा देत सजग सहभाग नोंदवला.
कार्यक्रमासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात, निर्भया पथक प्रमुख दीपा पाटील, भरोसा सेल कराड च्या हसीना मुजावर, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत वाघमारे, विजय मुळे, अमित वाघमारे, रवि राठोड, अक्षय कुमार शेंडगे, सुरज भोसले, सविता मोहिते, मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माजी व्हाइस चेअरमन अरुणादेवी पाटील, संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष भास्करराव पाटील, खजिनदार तुळशीराम शिर्के, संचालक वसंतराव चव्हाण, प्रा. संजय थोरात, पोलीस पाटील प्रशांत गावडे, सारिका गावडे, रोटरी क्लबचे सलीम मुजावर, अध्यक्ष चंद्रशेखर दोडमणी, माजी अध्यक्ष विलास पवार, सचिव विकास थोरात, इनरव्हील क्लब मलकापूरच्या छाया शेवाळे व सहकारी, काले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी कागदी, अरुण पवार, एनसीसी, एम सी सी, स्काऊट गाईड पथक आ.च. विद्यालय, यांची विशेष उपस्थिती होती.
महिला अत्याचार जनजागरण रॅली व मेळाव्याचे यशस्वी व नेटके नियोजनासाठी श्री मळाई महिला विकास मंचच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. अरुणादेवी पाटील यांनी मेळावा यशस्वी पार पडल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.