
कराड : कराड – तासगाव मार्गावर गोळेश्वर हद्दीत भरधाव टेम्पोची धडक लागून एका तरुण ठार झाला आहे. सौरभ सहदेव धर्मे (वय 30, रा. गोळेश्वर, ता. कराड, मूळ रा. पडसाळी, ता. उत्तर सोलापूर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत दत्तात्रय भागवत ढोणे (वय 40, रा. गोळेश्वर) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, रविवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास सौरभ धर्मे व त्यांचा मित्र प्रकाश डागे हे तासगाव – कराड रोडवर शिवशंभू किराणा दुकानासमोरून पायी जात होते. त्यावेळी शेणोली बाजूकडून येणाऱ्या टेम्पोने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात सौरभ धर्मे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. टेम्पो चालक जयवंत सुदाम गायकवाड (वय 50, रा. शेणोली, ता. कराड) हे अपघातास कारणीभूत असल्याचे फिर्यादीत करण्यात आला आहे. कराड शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

