शरद पवारांच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत : अमित शहा

शिर्डी : ठाकरे कुटुंब व शरद पवार कुटुंबाकडून भाजपबाबत सध्या चांगली वक्तव्ये केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात ठाकरे गट किंवा शरद पवार गट हा महायुतीत येण्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
मात्र आज शिर्डीतील भाजपच्या राज्यस्तरिय अधिवेशनाच्या समारोपाच्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वेगळाच संदेश देत, भाजपचे धोरण स्पष्ट केले.
शिर्डीतील भाषणात अमित शहा यांनी शरद पवार व उद्धव ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला. महाराष्ट्राच्या जनतेचा ज्यांनी विश्वासघात केला, त्यांना जनतेने जागा दाखवल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, १९७८ साली शरद पवारांनी विश्वासघात केला होता. त्यावेळी याच जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली होती. त्यानंतर २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत विश्वासघात केला होता. बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले होते. त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली. १९७८ ते २०२४ पर्यंत ज्यांनी-ज्यांनी महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न केला, त्यांना-त्यांना जनतेने जागा दाखवून दिली आहे.
अमित शहा म्हणाले, जेव्हा-जेव्हा महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा-तेव्हा महाराष्ट्रातील जनतेने स्थिर सरकार दिले. आताही हिंदूत्व व पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विकासाला जनतेने स्विकारले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत खरी शिवसेना कोणती व खरी राष्ट्रवादी कोणती हे जनतेने दाखवून दिले आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच खरी आहे आणि अजित पवारांची राष्ट्रवादीच खरी आहे, हे तुम्ही त्यांना दाखवून दिले आहे, असे गौरवोद्गार अमित शहा यांनी काढले.
अमित शहा म्हणाले, शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, देशाचे कृषीमंत्री होते. परंतु त्यांच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. या आत्महत्या भाजपने थांबवल्या. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचवल्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत. शेतकरी, विद्यार्थी, सामान्यांचे हे सरकार आहे. महाराष्ट्रातील महायुतीच्या महाविजयाने देशातील राजकारणही वेगळ्या उंचीवर गेले. या महाविजयाचे श्रेय भाजप कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील जनतेला आहे, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपासून फडणवीसांचे कौतूक सुरु केले आहे. मध्यंतरी सुप्रिया सुळे व शरद पवार गटाच्या नेत्यांनीही भाजपचे कौतूक सुरु केले होते. त्यानंतर शरद पवार गट व उद्धव ठाकरे गट महायुतीत सहभागी होईल, अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र आज अमित शहा यांच्या भाषणातून या फक्त चर्चाच असल्याचे स्पष्ट झाले. आजच्या भाषणात शहा यांनी उद्धव ठाकरे व शरद पवारांवर कडाडून टिका केली.