
कराड : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणण्यासाठी आ.डॉ. अतुलबाबा भोसले सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात कराड दक्षिणमधील रस्ते सुधारणा व पुलांच्या बांधकामांसाठी भरघोस निधी मिळावा, यासाठी आ.डॉ. भोसले यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले व मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातात्याने पाठपुरावा केला होता. याची दखल घेत ना. फडणवीस यांनी नाबार्ड व सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध विकासकामांसाठी ३३ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर केला आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला नवे बळ देणारा महत्त्वाचा टप्पा गाठत राज्याच्या अर्थसंकल्पात तब्बल ३३ कोटी ६७ लाख रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. गेल्या काही वर्षांपासून मतदारसंघातील रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार अतुल भोसले यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुर्गम भागातील गावांना चांगली दळणवळण सुविधा मिळावी आणि ग्रामीण भागाचा विकास वेगाने व्हावा, या उद्देशाने ही कामे अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत.
रा. म. ४ ते कोयना वसाहत – जखिणवाडी – नांदलापूर – पाचवड फाटा – मुनावळे – कालेटेक – नारायणवाडी – आटके जाधव मळा – ठोंबरे मळा – रेठरे बु. या प्रजिमा-८० मार्गावर कि.मी. १६/९०० ते १९/४०० या दरम्यान जाधव मळा ते रा. मा. १४८ या भागात नवीन रिटेनिंग वॉल बांधण्यासह रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याच मार्गावरील कोयना वसाहत ते नांदलापूर या भागातील कि.मी. ०/०० ते ४/५०० पर्यंतच्या रस्त्याच्या सुधारणेसाठीही ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील पाचवडेश्वर – कोडोली – दुशेरे – शेणोली स्टेशन या प्रजिमा ६५ मार्गावर कि.मी. ७/०० ते १२/०० या दरम्यानच्या रस्त्याच्या सुधारणा कामासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येणके – आणे – कोळे – कोळेवाडी ते पुनर्वसित घारेवाडी या प्रजिमा-७६ मार्गावरील कोळेवाडी ते बामणवाडी या कि.मी. १०/५०० ते १३/३०० भागातील रस्त्याच्या सुधारणेसाठी २ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला दिलासा देण्यासाठी आटके टप्पा ते आटके जाधव मळा – रेठरे बु. व्हाया डंगारे वस्ती – पवार मळा – खुबी या प्रजिमा-७७ मार्गावरील कि.मी. ६/०० ते ८/००० आणि १८/७०० ते १९/३०० या भागातील रस्त्याच्या सुधारणेसाठी १ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कालेटेक – काले – संजयनगर – कालवडे – नांदगाव – साळशिरंबे – पाचुंब्री या प्रजिमा-७३ मार्गावरील कालेटेक ते कालवडे या कि.मी. ०/०० ते ४/५०० दरम्यानच्या रस्त्याच्या सुधारणेसाठी ३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
वाखाण वस्ती कराड ते ढेबेवाडी या प्रजिमा-५५ मार्गावर विंग ते घारेवाडी या कि.मी. १४/०० ते १७/०० भागात रस्त्याची सुधारणा आणि दुतर्फा बंदिस्त गटर बांधकाम करण्यासाठी १ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याच मार्गावरील बैलबाजार रस्ता (रा. मा. १४४) ते ढेबेवाडी फाटा या कि.मी. ७/२०० ते ८/०० भागात काँक्रीट रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी तब्बल १० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे वाहतूक सुलभ होऊन परिसरातील आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळणार आहे.
याशिवाय नांदगाव दक्षिण येथे मांड नदीवर कि.मी. १/४०० मध्ये मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी ६ कोटी ७३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून या पुलामुळे अनेक गावांमधील संपर्क अधिक मजबूत होणार आहे. तसेच कराड येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालयीन इमारतीच्या बांधकामासाठी १ कोटी ९३ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
कराड दक्षिणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आमदार अतुल भोसले यांनी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न अधिवेशनात ठामपणे मांडले होते. ग्रामीण भागातील नागरिकांना चांगले रस्ते, मजबूत पूल आणि सक्षम पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी घेतलेली धडपड आता प्रत्यक्ष विकासकामांच्या रूपाने समोर येत असल्याचे चित्र आहे. या मंजुरीमुळे कराड दक्षिणच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून भविष्यातही मतदारसंघाच्या प्रगतीसाठी निधी खेचून आणण्याचा निर्धार आमदार भोसले यांनी व्यक्त केला आहे.

